नाशिकमध्ये ३६ तासांत ५८.६ मि.मी पाऊस
By admin | Published: July 3, 2016 07:28 PM2016-07-03T19:28:20+5:302016-07-03T19:28:20+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या सावटाखाली वावरणाऱ्या नाशिककरांवर शनिवारी (दि.२) मध्यरात्री वरुणराजाची अखेर कृपादृष्टी झाली. रविवारी सकाळपासून पावसाची शहरासह उपनगरांमध्ये संततधार सुरू
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ३ : गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या सावटाखाली वावरणाऱ्या नाशिककरांवर शनिवारी (दि.२) मध्यरात्री वरुणराजाची अखेर कृपादृष्टी झाली. रविवारी सकाळपासून पावसाची शहरासह उपनगरांमध्ये संततधार सुरू होती. सायंकाळपर्यंत शहरात ४३.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान खात्याने केली तर ३६ तासांत शहरात ५८.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
जूनच्या उत्तरार्धात मुंबईत मान्सून दाखल होताच नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या. पावसाच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना चिंब भिजण्याची लागलेली ओढ अधिक वाढली; मात्र आकाशात नुसतीच ढगांची गर्दी होत होती आणि दाटलेले नभ नाशिककरांना दररोज हुलकावणी देत होते. पाण्याच्या प्रतीक्षा सर्वसामान्यांपासून तर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अन् पालिकेच्या राज्यकर्त्यांनाही होती. पावसाची जोरदार हजेरी अनुभवण्यासाठी नाशिककर आतुर झाले असताना गोदामाईलाही पावसाची तेवढीच प्रतीक्षा होती. गोदावरीचे कोरडेठाक पात्र बघण्याची दुर्दैवी वेळ नाशिककरांवर यंदा आली होती. शनिवारी मध्यरात्री पावसाने दमदार सलामी दिली. रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तासांची विश्रांती घेत पुन्हा पावसाला सुरुवात झाली अन् दिवसभर संततधार सुरूच होती. शहरासह उपनगरांमधील रस्ते जलमय झाले होते. गोदापात्राबरोबरच नासर्डीच्या पात्रातही पाण्याचा प्रवाह वाढला आणि नाशिककरांची मने सुखावली. मागील अनेक दिवसांपासून कोरडेठाक नदीपात्र बघणाऱ्या नाशिकरांना प्रवाहित पात्रामुळे झालेल्या आनंदापुढे आकाश ठेंगणे झाले होते. सकाळी अकरा वाजेपासूनच गोदापात्राच्या पुलांवर येऊन अबालवृद्धांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. टॅँकरने रामकुंड भरण्याची दुर्दैवी वेळ महापालिकेवर यावर्षी ओढावली होती. वरुणराजाच्या कृपेने नैसर्गिकरीत्या रामकुंड खळाळून प्रवाहित झाल्याचे समाधानकारक चित्र रविवारी सकाळी बघावयास मिळाले.