घाबरू नका, लगेच मला कॉल करा! नाशिकच्या या SP 15 तासांच्या ड्युटीत डॉक्टर बनूनही घेतायेत सहकाऱ्यांची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 01:43 PM2020-04-11T13:43:19+5:302020-04-11T14:05:57+5:30
नाशिक ग्रामीण महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या केवळ पोलीस म्हणूनच कर्तव्य बजावत नाही. तर आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आरोग्याचीही तेवढीच काळजी घेत आहेत.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सबंद देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक वेळ सेवा द्यावी लागत आहे. हीच परिस्थिती नाशिक शहरातही आहे. मात्र, येथील ग्रामीण महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या केवळ पोलीस म्हणूनच कर्तव्य बजावत नाही. तर आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आरोग्याचीही तेवढीच काळजी घेत आहेत. कुठल्याही आजाराची लक्षणे आढळून आली, तर घाबरू नका, लगेच मला कॉल करा, असे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले आहे.
डॉ. आरती सिंह या एमबीबीएस आहेत. त्या 15-15 तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची अत्यंत काळजी घेत आहेत. त्या सातत्याने बैठका आणि वॉकी-टॉकीच्या माध्यमाने सहकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करत असतात. एवढेच नाही, तर स्वतः पोलीस कॉलनींमध्ये जाऊन त्या करर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवादही साधतात. त्यांना सोशल-डिस्टंसिंगचे पालण करणे, घरातच थांबणे, याच बरोबर पोलीस कर्मचाऱ्यांचा आहार कसा असावा, यासंदर्भातही माहिती देतात.
एमबीबीएसनंतर 2004मध्ये झाल्या आयपीएस अधिकारी -
डॉ. आरती या मुळच्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील आहेत. एमबीबीएसनंतर त्यांनी वाराणसी येथील एका सरकारी रुग्णालयातही काम केले आहे. त्या दुसऱ्या प्रयत्नातच 2004 मध्ये यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या आहेत.
भंडाऱ्याच्या पहिल्याच महिला पोलीस अधिकारी -
आयपीएस झाल्यानंतर आरती आरती यांची पहिली पोस्टिंग नक्षलवाद्यांचा गड असलेल्या दक्षीण गडचिरोलीमध्ये झाली होती. यानंतर 2011मध्ये त्या भंडारा येथे आल्या. त्या 56 वर्षोंतील भंडाऱ्याच्या पहिल्याच महिला पोलीस अधिकारी होत्या.
राज्यातही वाढतोय मृतांचा आकडा -
राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 110 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोना बाधितांचा आकडा 1574वर पोहोचला आहे.