10वीच्या विद्यार्थिनीला प्रपोज करणा-या शिक्षकाला चोपलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 06:00 PM2018-06-01T18:00:23+5:302018-06-01T19:25:26+5:30
दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
इंदिरानगर- दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. सुनील कदम असे वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण(पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. दहावीला गेलेल्या मुलीस शाळेची तयारी करण्यास सांगितले असता मी शाळेत जाणार नाही, असे सांगून तिने रडण्यास सुरुवात केली. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूर केली असता तिने नववीचे वर्गशिक्षक सुनील कदम हे शाळेतील मधल्या सुट्टीत अश्लील संवाद साधत जवळ येण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी त्यांना प्रतिसाद देत नसल्यानं त्यांनी नववीत नापास करण्याची धमकीही दिली होती. त्यातच दहावीला तेच वर्गशिक्षक असल्याने मला शाळेत जाण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे शिक्षक कदम याने 22 एप्रिल 2018 रोजी या मुलीच्या इमो मेसेंजरवर अश्लील मेसेज पाठविला होता. मुलीच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुलीचे आई-वडील, नातेवाईक व काही पालक शाळेत गेले. त्यांनी शिक्षक सुनील कदम यास जाब विचारून बेदम मारहाण केली. त्यानंतर कदम फरार झाला असून, मुलीच्या आईने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी शिक्षक सुनील कदमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनी ही नववीला असताना वर्गशिक्षक असलेला सुनील कदम शाळेच्या मधल्या सुट्टीत भेटून जवळीक साधून अश्लील संवाद साधण्याबरोबरच 'तू मला खूप आवडते, आल लव्ह यू', असे बोलत असत. याबाबत घरी काही सांगितले तर नववीच्या वर्गात नापास करेल, अशी धमकी देत असे. दहावीलादेखील कदम हेच वर्गशिक्षक असल्याचे कळाल्यानं संबंधित विद्यार्थिनी शाळेत जाण्यास तयार नव्हती. आई-वडिलांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.