नाशिक : भंगार बाजारात आगीच्या दोन घटना
By admin | Published: January 10, 2017 02:17 PM2017-01-10T14:17:17+5:302017-01-10T14:20:43+5:30
नाशिकमधील भंगार बाजारातील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असून दोन ठिकाणी आग लागली.
Next
>नरेंद्र दंडगव्हाळ, आॅनलाईन लोकमत
नाशिक, दि. १० - मागील तीन दिवसांपासून भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भंगारमालाचा व पत्र्यांचा खच पडलेला आहे. या खचमधून वस्तू काढताना व्यापा-यांना गॅस कटरच्या साहाय्याने कापले जात आहे. त्यामुळे ठिणग्या उडून प्लॅस्टिक व लाकडी फळ्यांनी पेट घेतल्याने आग लागली. दीड तासांतच आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळविणे शक्य अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. या घटनेत कुठल्याप्रकारची जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
अंबड सातपूर लिंकरोडवर महापालिकेच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रण हटविले जात आहे. सुमारे साडेचारशेहून अधिक भंगारमालाची गुदामे जमीनदोस्त करण्यात आल्याने संपूर्ण भंगारबाजार नष्ट झाला आहे. यामुळे सर्वत्र प्लॅस्टिक, पत्रे, लोखंडी गज, लाकडी फळ्यांचा खच पडला असून या खचमधून व्यावसायिकांनी तातडीने वस्तू घेऊन जाव्यात, अशा सुचना महापालिकेने दिल्या आहेत. पत्त्यांच्या इमल्याप्रमाणे कोसळलेल्या भंगार मालाच्या गुदामांमध्ये दबलेल्या वस्तूंची शोधाशोध सुरू असून यासाठी गॅस कटरमार्फत तुटलेले गज व शेडचे पत्रे कापले जात आहे. व्यावसायिकांकडून यासाठी घरगुती गॅससिलिंडरचा वापर केला जात आहे. यामुळे ठिणग्या पडून आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अद्याप तीन वेळा भंगार बाजार भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. सकाळी विराटनगर व दुपारी बारावाजेनंतर अजमेरी चौकामध्ये दोन ठिकाणी प्लॅस्टिकच्या वस्तू व लाकडी फळ्यांनी पेट घेतला होता.
घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोडया उपकेंद्राचे प्रत्येकी दोन तर मुख्यालयासह विभागीय कार्यालयाचे प्रत्येकी एक आणि औद्योगिक वसाहतीमधील काही खासगी बंबांच्या साहाय्याने लागलेल्या आगीवर तत्काळ पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणली गेली आहे. आग अचानकपणे लागली की लावण्यात आली याबाबत सत्त्यता अग्निशामक दलाकडून तपासली जात आहे.