नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण
By admin | Published: March 17, 2017 02:58 PM2017-03-17T14:58:21+5:302017-03-17T14:58:21+5:30
धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (17 मार्च) नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरेक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच डाँक्टरांनी बंद पुकारला आहे. आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी लावून धरली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टराला झालेल्या मारहाण प्रकरणी राज्यभरातील ४ हजारहून अधिक निवासी डॉक्टर शुक्रवारी मासबंक करणार होते. मात्र हा राज्यव्यापी ‘मासबंक’ गुरुवारी रात्री उशिरा मागे घेण्यात असून शुक्रवारी केवळ इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रकरणी आझाद मैदान येथे निदर्शने करणार आहेत.
गेल्या २ वर्षात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या ४५ घटनांची नोंद झाली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये पोलीसांमध्ये तक्रार दाखल करुनही निकाल न लागल्याने डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्या, तक्रारींसाठी राज्यव्यापी मासंबक करण्यात येणार होता.
याविषयी, मार्डचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम यांनी सांगितले की न्यायालयाच्या निर्णयामुळे मासबंक मागे घेतला आहे. मासबंकचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये,याकरिता ही भूमिका घेण्यात आली आहे. काळ्या फिती लावून निवासी डॉक्टर निदर्शने करणार असून मार्डची पुढील भूमिका चर्चा करुन ठरविण्यात येईल.
तर दुसरीकडे, धुळ्यातील डॉक्टरवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजूट केली आहे. स्वरक्षणासाठी एल्गार पुकारत असे प्रकार तातडीने रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन शासनाला करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करीत तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी डॉक्टरांकडून निषेध रॅली काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात आली होती.धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन म्हामुनकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला केला. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.