नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं
By admin | Published: April 30, 2017 09:14 PM2017-04-30T21:14:02+5:302017-04-30T21:14:02+5:30
नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 30- नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. द्राक्षांच्या भावांमध्ये घसरण झाल्याने आधीच चिंतेत असलेल्या शेतक-यांना गारपिटीचा तडाखा बसला आहे.
तसेच काढणीला आलेल्या कांद्यालाही मोठ्या प्रमाणात गारपिटीचा फटका बसला असून काही शेतक-यांचा काढणीनंतर खळ्यावर पडलेला कांदाही भिजला असून गेल्या दोन-तीन वर्षाच्या दुष्काळापासून सावरत असलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे.
चितेगाव व सिद्धपिप्री शिवारात रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल दिसून येऊ लागल्याने शेतक-यांची धावपळ उडाली. आकाशात लखलखणा-या विजांसह ढग गोळा होऊ लागल्याने शेतक-यांनी काढणीनंतर पडून असलेला कांदा झाकण्याचा प्रयत्न केला.
परंतु, अवघ्या एक तासात जोरदार गारपिटीला सुरुवात झाल्याने अनेक शेतक-यांना त्यांचा शेतमाल वाचवण्यात अपयश आले. परिसरात जोरदार गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्षबागांसह काढणीला आलेला कांदा, टोमॅटो,कोथिंबीर व अन्य भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून शेतक-यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.