राज्य आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे अर्भकांचा मृत्यू : प्रीती मेनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:09 PM2017-09-11T23:09:40+5:302017-09-11T23:12:09+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या जीविताच्या रक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा न पुरविता वेळकाढू धोरणाचा अवलंब करणारा राज्य शासनाचा आरोग्य विभाग अर्भक मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन - शर्मा यांनी केला़ जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे मेनन यांनी केली आहे़
प्रीती मेनन यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची माहिती जाणून घेतली़ यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालयास आवश्यक त्या सेवासुविधा पुरविल्या जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ डॉ़जगदाळे यांनी अर्भकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य शासनाकडे सीपॅप (पॉझिटीव्ह एअर प्रेशर) मशीनची मागणी केल्याचे सांगताच या मशीन केव्हा येणार याबाबत त्यांनी विचारणा केली़ जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांच्या कामांबाबत माहिती घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या नूतन इमारतीसाठीच्या अडथळ्यांची त्यांनी माहिती घेतली़
मेनन यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अर्भकांसाठी सरफॅक्शन इंजेक्शन, लसींचा मुबलक साठा, व्हेंटिलेटर, इन्क्युबेटरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्याची मागणी केली़ यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, एसएनसीयू कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गाजरे उपस्थित होते़ जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी तोडाव्या लागणाºया वृक्षांबाबत आंदोलन करून आपल्याच कार्यकर्त्यांना खोडा घातल्याचे मेनन यांना पत्रकारांनी विचारताच त्यांनी सोयीस्करपणे या प्रश्नाला बगल दिली़