राष्ट्रीय लोकअदालतीत दोन लाख प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:02 PM2017-12-04T23:02:27+5:302017-12-04T23:04:38+5:30
नाशिक : देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये ९ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा न्यायालयाने जय्यत तयारी केली आहे़ या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमधील दावा दाखल पूर्व (प्री-लिटीगेशन) व दाखल असे सुमारे दोन लाख प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी दिली़ गत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने सर्वाधिक प्रकरणे निकाली काढले होते़
शिंदे यांनी सांगितले की, शनिवारी होणाºया लोकअदालतीमध्ये नाशिक महानगरपालिकेचे नऊ हजार ९३५, बँकांमधील एक हजार ३५५, दूरसंचार कंपन्यांचे सहा हजार २००, फायनान्सचे चार हजार ५४९, विद्युत वितरण कंपनीचे सहा हजार १३५, वाहतूक शाखेचे सात हजार तर नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे १८ हजार १२५ दावा दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहे़ याखेरीज मालेगाव तालुक्यातील ६२ हजार दावा दाखल प्रकरणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दाखल असलेली दहा हजार प्रकरणेही या लोकअदालतीत ठेवण्यात आली आहे़
जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश एस़ एम़ बुक्के व कर्मचारी गत दोन महिन्यांपासून अविरत काम करीत असून, पक्षकारांना नोटिसा बजावण्याचे काम अंतिम चरणात आहे़ गत राष्ट्रीय लोकअदालतीला पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला होता़ या लोकअदालतीसाठी पक्षकारांनी अधिक प्रतिसाद दिला आहे़ विशेष म्हणजे यावेळी ठेवण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या व प्रतिसाद पाहता पक्षकारांच्या वाहनांसाठी जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे़
या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवली जावी, या जनजागृतीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या़ या लोकअदालतीमध्ये जास्तीत प्रकरणे निकाली निघावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले़
लोकअदालत ही लोकचळवळ
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघणारी प्रकरणे वा दाव्यांमुळे दोन्ही पक्षकारांचा फायदा होतो़ त्यांच्यातील संबंध टिकून राहतात तसेच या निकालास विलंबही लागत नाही़ मात्र, यासाठी दोघांचीही संमती आवश्यक आहे़ लोकअदालत ही आता लोकचळवळ झाली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयाने गतवेळी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता़ निपटारा झालेल्या प्रकरणात फायदा झालेल्या पक्षकारांनी या लोकअदालतीचा चांगला प्रसार केला आहे़
- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक