दिव्यांगांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष : कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:52 PM2018-03-25T22:52:07+5:302018-03-25T22:52:07+5:30
नाशिक : धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यांगांकडून मिळते़ जगातील अव्वल दर्जाच्या साहित्यनिर्मितीत दिव्यांगांचा मोठा वाटा असून, त्यांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष व्यक्त होतो़ त्यामुळे स्वत:ला कमी न लेखता आपले साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पसरवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांनी केले़
नाशिक : धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यांगांकडून मिळते़ जगातील अव्वल दर्जाच्या साहित्यनिर्मितीत दिव्यांगांचा मोठा वाटा असून, त्यांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष व्यक्त होतो़ त्यामुळे स्वत:ला कमी न लेखता आपले साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पसरवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांनी केले़
गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्समध्ये आयोजित दोनदिवसीय सातव्या अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी कांबळे बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, अपघाताने लादलेल्या अपंगत्वावर मात करून इतिहासाने पान तयार करण्याचा दिव्यांगांचा इतिहास असून, माणसामाणसामध्ये भेद करणारा दिव्यांग हा शब्द आपणास मान्य नाही़ निसर्गाने दिलेल्या वेदनेला ओझे न समजता त्यात लपलेली कलाकृती बाहेर काढायला हवी, कारण निसर्ग केवळ वेदना देत नाही तर त्याचबरोबर सदृढ मन, तल्लख मेंदू, प्रतिभा व वेदना सहन करण्याची ताकदही देतो़ शरीराने सुदृढ मात्र मनाने पांगळ्या असलेल्यांना दिव्यांग हे दररोज जिंकणाऱ्या लढाईद्वारे प्रेरणा देतात़ त्यामुळे स्वत:चा तिरस्कार न करता अलौकिक प्रतिभेतून साहित्यनिर्मिती करा, असे कांबळे यांनी सांगितले़
संमेलनाच्या अध्यक्षा इंदरजित नंदन यांनी, देशपातळीवरील दिव्यांग साहित्यिकांना भेटण्याची संधी व त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगत अधिकारांप्रती जागरूक असलेल्या दिव्यांगाची प्रचिती आल्याचे सांगितले़ पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिव्यांग कोणत्याही क्षेत्रात कमी नसून या प्रकारच्या साहित्य संमेलनातून प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले़ तर नॅबचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दोनदिवसीय संमेलनाचा आढावा घेतला़ यावेळी व्यासपीठावर साहित्य व सांस्कृतिक मंडळ पुणेचे अध्यक्ष बापूसाहेब बोभाटे, सचिव नीलेश छडवेलकर, विश्वस्त सुहास तेंडुलकर, संयोजन समितीचे अध्यक्ष सचिन पानमंद, उपाध्यक्ष भावना विसपुते, शारदा गायकवाड, कार्याध्यक्ष सुनील रुणवाल, कार्यवाहक पांडुरंग भोर उपस्थित होते़
दिव्यांग साहित्य संमेलनातील ठराव
एक देश, एक नाव, एक पेन्शन मिळावी (दिव्यांगांना दिल्ली सरकार दोन हजार रुपये, महाराष्ट्र सरकार ६०० तर उत्तर प्रदेश सरकार ३०० रुपये पेन्शन देते़ ) भारत हा एक देश, अंध अपंगांना दिव्यांग हे एक नाव तसेच देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दिव्यांगांना मिळणारी पेन्शनही एक समान असावी़, किमान मूलभूत गरजा पूर्ण करता येतील अशा सुविधा सरकारने दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्याव्यात़ दिव्यांग साहित्यिक व कलाकार यांना दहा हजार रुपये मानधन द्यावे़
यशोगाथेतून मिळाली प्रेरणा
भारत-पाक युद्धात शरीरात नऊ गोळ्या घुसल्याने अपंगत्व आल्यानंतरही हार न मानता जागतिक जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मुरलीकांत पेटकर यांनी मुलाखतीत आपला जीवनप्रवास उलगडून दाखविला़ दिव्यांगांना सहानुभूती वा भीक नको तर त्यांना रोजगाराची आवश्यकता असल्याचे सांगितले़ तर दिव्यांग असतानाही आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर नायब तहसीलदार पदावर काम करणाºया हंसराज पाटील यांची सुनील रुणवाल यांनी प्रकट मुलाखत घेतली़ या मुलाखतीत जन्मत:च सेरेबल पाल्सी हा विकार असताना कुटुंबाचे विशेषत: आईच्या प्रोत्साहनाच्या बळावरच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले. जलतरणातील अनेक पारितोषिके पटकावली यामध्ये कुठेही दिव्यांगत्व आड आले नसल्याचे त्यांनी सांगितले़