नाशिकमधील सराईत घरफोड्या नेपाळमध्ये हॉटेल व्यवसायिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:57 PM2018-02-21T19:57:25+5:302018-02-21T20:23:47+5:30
नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे त्या ठिकाणी हॉटेल्स खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी येणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यांची कबुली संशयित भांडारे याने दिली असून त्याच्याकडून १४ लाख रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने हस्तगत केले असून चोरीचे सोने विकत घेणाºया मुंबईतील एका संशयितास अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांनी बुधवारी (दि़२१) पत्रकार परिषदेत दिली़
सिंगल यांनी सांगितले की, आॅक्टोबर २०१६ मध्ये टागोरनगरमध्ये भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिण्याची चोरी केल्याची घटना घडली होती़ संशयित गणेश भंडारे यानेच ही घरफोडी केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते, मात्र या घटनेनंतर तो नेपाळमध्ये फरार झाला होता़ नेपाळमध्ये त्याच्या शोधासाठी गेलेल्या पथकास गुंगारा मारण्यात भंडारे यशस्वी झाला होता़ शहर गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना भंडारे नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळाली होती़ व्हॅलेंटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी युनिट एकने सीबीएस परिसरात भंडारे यास सापळा लावून अटक केली़
संशयित भंडारेची कसून चौकशी केल्यानंतर त्याने उपनगरमध्ये दोन तर गंगापूर पोलीस ठाण्यात एक अशा तीन घरफोड्यांची कबुली दिली़ घरफोडीतील चोरीचे सोने पॉलिश करून देणारा तसेच खरेदी करणारा मुंबईतील दीपक देवरुखकरची माहिती दिल्यानंतर त्यासही मुंबईतून अटक करण्यात आली आहे़ या दोघांकडून तीन घरफोड्यांमधील सुमारे १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे़ आयुक्त डॉ. सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते, महेश कुलकर्णी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली़
रिसॉर्ट खरेदीसाठी पैशांची आवश्यकता
सराईत भंडारे याने नेपाळी युवतीशी विवाह केला व चोरीच्या पैशातून दोन हॉटेल खरेदी केली़ आणखी एक रिसोर्ट खरेदी करण्यासाठी त्यास पैशांची आवश्यकता असल्याने तो नाशिकला आला होता़ नाशिकमध्ये घरफोडी करून त्या पैशातून हे रिसॉर्ट खरेदी करायचे होते. दरम्यान, नाशिक पोलीसांनी भंडारेच्या शोधासाठी इंटरपोलकडेही प्रस्ताव दिला होता.