नाशकात बेवारस स्फोटके सापडल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:10 PM2017-10-03T14:10:41+5:302017-10-03T14:18:23+5:30
नाशिक : पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढेवस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीत जिलेटीनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्स सापडल्याची घटना सोमवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास घडली़ नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी करून स्फोटकांची गोणी ताब्यात घेतली़ या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, परिसरातील डोंगर फोडून खडीक्रेशरसाठी लागणाºया दगडासाठी या स्फोटकांचा वापर केला असल्याची परिसरात चर्चा आहे़
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी - गौळाणे रस्त्यावर असलेल्या मोंढी वस्तीलगत रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका बेवारस स्थितीतील गोणी नागरिकांना आढळून आली़ या गोणीमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिसांना याबाबत माहिती दिली़ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकास (बीडीडीएस) माहिती दिली़ या पथकाने वस्तुची तपासणी केली असता ६० जिलेटीनच्या कांड्या व १७ डिटोनेटर्स आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत़
या प्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय पाळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात स्फोटक पदार्थ निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़