नाशकात भिका-यानेच केला भिका-याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 10:02 PM2017-12-02T22:02:27+5:302017-12-02T22:08:39+5:30
:
नाशिक : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात फिरस्त्या असलेल्या दोघा भिका-यांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिका-याने दुस-या भिका-याच्या पायावर चाकूने वार तसेच हाताच्या चापटीने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ अरूण भामरे (५६) असे खून झालेल्या भिका-याचे नाव असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशातील ब-हाणपूर येथील भिकारी संशयित अनिल बाबुराव आपटे (५४) यास ताब्यात घेतले आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरात मयत भामरे व संशयित आपटे हे दोघेही फिरस्ते असून ते भिक्षा मागण्याचे काम करतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत रामकुंड परिसरात बसलेले असतांना भामरे याने आपटे याची बॅग फाडली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला व संतापलेल्या आपटेने भामरेला चापटीने मारहाण करीत छोटया चाकूने डाव्या पायावर वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेला भामरे हा घटनास्थळी तसाच पडून होता तर त्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता़ त्यास १०८ अॅम्ब्युलन्स वाहनातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
भामरेचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले यांनी पंचवटी परिसरात चौकशी केली असता सायंकाळी दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाल्याची माहिती एका महिलेकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार सचिन म्हस्दे, विलास बस्ते, सतीश वसावे, भूषण रायते आदिंनी होळकर पुल, गंगाघाट, स्मशानभूमी, टाळकुटेश्वर पूल, भद्रकाली परिसरात संशयिताच्या वर्णनावरून शोध सुरू केला तब्बल सहा तासानंतर गंगाघाटावरील दत्त मंदिराजवळून आपटे याला ताब्यात घेतले़ त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे तपासात समोर आले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंढे करीत आहेत.
यापुवीर्ही झोपण्याच्या वादातून भिका-याचा खून
पंचवटी कारंजा परिसरात काही महिन्यांपुर्वीच झोपण्याच्या वादातून एका भिका-याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ त्यानंतर आता पुन्हा रामकुंड परिसरात भिका-याच्या खूनाची घटना घडली आहे़