पेट्रोलपंपावरील कर्मचारी महिलेकडील चार लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:10 PM2017-10-09T17:10:02+5:302017-10-09T17:16:54+5:30
नाशिक : राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या महिला कर्मचाºयास राणेनगर येथील समांतर रस्त्यावर चारचाकीने धडक देऊन खाली पाडून तिच्याकडील चार लाख रुपयांची बॅग लुटल्याची घटना सोमवारी (दि़९) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली़ महामार्गावरील समांतर रस्त्यांवर भरदिवसा होत असलेल्या लूटमारीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर नीलिमा शिंदे या कामास आहेत़ सोमवारी अकरा वाजेच्या सुमारास नेहेमीप्रमाणे पाथर्डी फाट्यावरील अॅक्सिस बँकेत पेट्रोलपंपावरील जमा रक्कम भरण्यासाठी आपल्या लाल रंगाच्या अॅक्टिवाने (एमएच १५, डीपी ८३२२) जात होत्या़ शिंदे या पेट्रोलपंपापासून शंभर-दिडशे मीटर अंतरावर जात नाही तोच त्यांच्या दुचाकीला पांढºया रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक देऊन त्यांना खाली पाडले़
शिंदे यांना चारचाकीने धडक दिल्यानंतर त्या खाली पडल्या असता चारचाकीमधील संशयितांनी उचलण्याचे नाटक करीत त्यांच्याजवळील तीन लाख ७६ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन फरार झाले़ या घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळविताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, उपनिरीक्षक सुनील बोडके हे घटनास्थळी दाखल झाले होते़
दरम्यान, या लूट प्रकरणातील चारचाकी वाहनाचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत़ दरम्यान या लुटीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़
एकामागोमाग अनेक लूटमारीच्या घटना
गत महिनाभरात जॉगिंग ट्रॅकलगत तिघा चोरट्यांनी एकास मारहाण करून लुटल्याची घटना घडली़ त्यानंतर पेठेनगर कॉर्नरवर रात्री एक वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी येणाºया कामगाराला अडवून तिघांनी मारहाण करीत मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला़ मात्र, संबंधित कामगाराने आरडा-ओरड केल्याने नागरिक मदतीला आले व संशयितांनी पळ काढला़ विशेष म्हणजे एकामागोमाग अनेक घटना घडूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही़