लाच प्रकरणातील तक्रारदारास अभियंत्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींकडून धमक्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:39 PM2017-10-16T17:39:39+5:302017-10-16T18:02:00+5:30

nashik,pwd,engineers,complainant,Threats | लाच प्रकरणातील तक्रारदारास अभियंत्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींकडून धमक्या...

लाच प्रकरणातील तक्रारदारास अभियंत्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींकडून धमक्या...

Next
ठळक मुद्दे सार्वजनिक बांधकाम विभागतक्रारदाराच्या जीवीतास धोकापोलीस संरक्षणाची मागणी

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाºया शासकीय ठेकेदाराच्या घरी जाऊन या अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंड प्रवृत्तीचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत़ त्यामुळे आपल्यासह कुटुंबियांच्या जीवितास धोका असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी तक्रारदाराने पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांच्याकडे केली आहे़ तसेच आपल्या व कुटुंबियांचे काही बरेवाईट झाल्यास संबंधित आरोपी व हितसंबंधितांना जबाबदार धरण्यात यावे असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़

शासकीय ठेकेदार युवराज पुंडलिक मोहिते (रा़ दिंडोरी रोड) यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उज्वल कन्स्ट्रक्शन या फर्मद्वारे गत दहा वर्षापासून मी शासकीय ठेकेदार म्हणून काम करीत आहे़ गत दोन वर्षांपासून केलेल्या वेगवेगळ्या कामांची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे़ यासाठी वारंवार कार्यालयात खेटा मारूनही दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील, शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी बिल काढून दिले नाही़ तसेच वेळोवेळी पैशांची मागणी करून मानसिक व आर्थिक छळ केला यामुळे परिस्थिती हलाखीची झाली़

अभियंत्यांकडे वारंवार बिल मागण्याची विनंती केली असता त्यांनी ६ लाख रुपयांची मागणी केली़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता या विभागाची कारवाई सुरू असताना अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंड प्रवृत्तीचे लोकांनी एसीबी कार्यालयात गर्दी केली होती़ तसेच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता़ कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार यांचे नातेवाईक मोठ्या राजकीय पदावर असून पाटील व देशपांडे या दोघांचेही राजकीय व बड्या व्यक्तींशी जवळीक आहे़

शनिवार (दि़१४) सकाळपासून पवार यांचे हितसंबधी लोक दोन वेळा मोहिते यांच्या घरी गेल्या व तक्रार मागे घ्यावी व प्रकरण मिटवून घ्यावे यासाठी दबाव टाकीत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे़ लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या या तिन्ही अभियंत्यांशी संबंधित राजकीय व्यक्ती व मोठ्या व्यक्तींकडून आपणास तसेच आपल्या कुटुंबियांना धोका असून संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करावी तसेच पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे़ या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते, विधानपरीषद विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक, पंचवटीचे सहायक पोलीस आयुक्त व म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत़

Web Title: nashik,pwd,engineers,complainant,Threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.