दृष्टीआड नाशिकची ‘रामसृष्टी’
By admin | Published: August 16, 2016 01:33 AM2016-08-16T01:33:34+5:302016-08-16T01:33:34+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही
- संंजय पाठक, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही अवस्था बिकट असून, नुकत्याच झालेल्या महापुरामुळे तर दृष्टीआड रामसृष्टी अशी अवस्था झाली आहे.
एखाद्या प्रकल्पाला विशिष्ट पक्ष अथवा व्यक्तीचे नाव जोडले गेल्यानंतर अर्थातच त्याची जबाबदारी संबंधितांची असते, प्रत्यक्षात तसे होत नाही. गोदापार्कचा नवा प्रकल्प गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे होत्याचा नव्हता झाला. तथापि, नाशिकमध्ये राजकीय अभिनिवेशातून अशाच प्रकारे भाजपाने रामसृष्टी उभारण्याचा केलेला खटाटोप पुरता वाया गेला आहे.
नाशिक महापालिकेच्या १९९७च्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने सत्ता आल्यास रामसृष्टी साकारण्याची घोषणा केली होती. ‘रामायण’ मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांची भेट घेऊन संकल्पना राबविण्याचे ठरले. नाशिक प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श लाभलेली भूमी असल्याने पाऊलखुणा जपण्यासाठी रामसृष्टी साकारण्याचा मनोदय व्यक्त झाला.
रामसृष्टीमध्ये रामाचे जीवनचरित्र रेखाटण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘लाइट अॅन्ड साउंड शो’च्या माध्यमातून हे चरित्र मांडण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याला आकार मिळाला नाही. २००५ मध्ये केंद्र शासनाने नेहरू अभियान राबविले तेव्हा गोदाकाठ सुशोभिकरण योजनेंतर्गत रामसृष्टीचा समावेश करण्यात आला. २०११ मध्ये तपोवनात लक्ष्मीनारायण पुलाखाली सुमारे सात एकर जागेत उद्यान साकारण्यात आले आणि त्यात पॅगोडा तसेच हॉल साकारण्यात आला. यात राम जीवनावरील सुमारे १३ म्युरल्स लावण्यात आले आहेत.
तीन कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात आले, परंतु जी अवस्था गोदापार्कची तीच रामसृष्टीचीही झाली आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरच साकारलेल्या रामसृष्टीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या आठवड्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कबरोबरच रामसृष्टीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यात सत्ता असूनही...
राज्यात भाजपाची सत्ता तर आहेच, शिवाय नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार भाजपाचेच आहेत. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, त्या वेळी रामसृष्टीच्या पुनर्निर्माणाची मोठी संधी होती, परंतु भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पाची रया गेली आहे.