एसटीच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे संजय खांदारे चर्चेत
By Admin | Published: May 15, 2014 09:38 PM2014-05-15T21:38:09+5:302014-05-15T23:32:26+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून एसटी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त असून या पदांवर अजूनही शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली नाही.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त असून या पदांवर अजूनही शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली नाही. पण, या पदांसाठी नाशिकच्या पालिका आयुक्तपदी राहिलेले संजय खंदारे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त गोपाळ रेड्डी यांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एसटीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी साडेतीन वर्षे राहिलेले दीपक कपूर यांची २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अन्न व नागरी पुरवठा विभागात सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर एसटीच्या या पदावर विकास खारगे यांची नेमणूक करण्यात आली. मात्र, खारगे यांनी सप्टेंबर २०१३ ते ७ मार्च २०१४ पर्यंत एसटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर, दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही या पदावर अन्य कुणाचीही नियुक्त झालेली नाही. जर निवडणुकीपूर्वी खारगे यांची सचिवपदी नियुक्ती होऊ शकते, तर एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदच रिक्त का ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. या पदाचा तात्पुरता कार्यभार सध्या राज्याचे परिवहन आयुक्त व्ही.एन. मोरे यांच्याकडे आहे.
उपाध्यक्षपदासाठी चर्चेतील खंदारे यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागली असताना काही निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली. नियमबाह्य पद्धतीने त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीनंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि या पदावर प्रभारी आयुक्त नेमण्यात आला. सध्या खंदारे यांच्याकडे एकही पद नाही. त्यामुळे त्यांना एसटीच्या उपाध्यक्षपदी नेमण्याचा विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र, स्वत: खंदारे हे पुन्हा नाशिक महापालिका आयुक्तपदी येण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्याचबरोबर एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी असलेले गोपाळ रेड्डी यांचेही नाव उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, रेड्डी यांची १३ फेब्रुवारीला एमएमआरडीए आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची या पदावरून एसटी उपाध्यक्षपदावर नियुक्ती होणे अशक्य असल्याचे एमएमआरडीएतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
..................................................
कपूर यांचे नावही स्पर्धेत?
दीपक कपूर यांनी जवळपास साडेतीन वर्षे एसटीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. कपूर यांनाच जास्त अनुभव असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक निर्णयही घेतले आहेत. त्यामुळे कपूर यांच्या नावाची चर्चाही सुरूू आहे.