शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने नाशिकमध्ये डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:40 PM2018-01-15T21:40:39+5:302018-01-15T21:45:46+5:30
नाशिक : बाथरूममध्ये शॉवरने आंघोळ करीत असताना अचानक शॉवरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१५) गंगापूररोड परिसरातील कुसुमाग्रज स्मारकाजवळ घडली. डॉ़ आशिष विलास काकडे (२४, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, लोटस हॉस्पिटलशेजारी, गंगापूररोड) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थ अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असल्याने रहिवाशांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता संपूर्ण घरात पाणी साचले होते. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बाथरूममध्ये जाऊन बघितले असता डॉ. आशिष काकडे हे अर्धनग्न अवस्थेत बाथरूममध्ये पडलेले होते़ रहिवाशांनी तत्काळ विद्युत पुरवठा बंद करून पोलिसांना माहिती दिली़
या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ डॉ़ काकडे यांच्या अंगावर ठिकठिकाणी विद्युत प्रवाहाने भाजल्याच्या खुना होत्या़ बाथरूममधील शॉवर व नळांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने डॉ़ काकडे यांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. डॉ. काकडे यांचा मृत्यू पहाटे आंघोळ करताना झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असून, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, मयत डॉ़ आशिष काकडे यांचे आई-वडीलही डॉक्टर असून ते नोकरीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे राहतात़