विंचूर दरोड्याचा अवघ्या बारा तासांत पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:25 PM2017-08-26T22:25:24+5:302017-08-26T22:28:24+5:30
नाशिक : लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर शिवारातील मरळगोई रस्त्यावरील दरेकर वस्तीवर शनिवारी (दि़२६) मध्यरात्री टाकलेल्या दरोड्यातील दोन दरोडेखोरांना अवघ्या १२ तासांत ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे़ राहुल खंडू टावरे (राग़जानन हौसिंग सोसायटी, खंडोबामाळ, भोसरी, पुणे) व अंकुश सुभाष लोळगे (रा़साईनाथ हॉस्पिटल, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, उर्वरित चौघा फरार संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
मरळगोई येथील रत्नाकर दरेकर यांच्या वस्तीवर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पाच-सहा दरोडेखोरांनी चाकू, कोयता, लाकडी दांडे, लोखंडी टामीच्या साहाय्याने किचनचा दरवाजा उचकावून घरात प्रवेश केला़ यानंतर दरेकर व त्यांच्या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
या दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व कर्मचारी यांनी आरोपींचा शोध सुरू केला़ दरोडेखोरांची संख्या लक्षात घेता त्यांनी नक्कीच वाहनाचा वापर केला असल्याचे अनुमान काढून परिसरातील ढाबे, पेट्रोलपंप यांची तपासणी सुरू केली़ त्यांना विंचूर-येवला रोडवरील हॉटेल अपनाजवळ सफेद रंगाची तवेरा वाहन (एमएच १४ बीए ६१०९) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळून आले़
सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी वाहनातील राहुल टावरे व अंकुश लोळगे यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यामुळे या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दरोड्याची कबुली देत चौघे साथीदार ऐवज घेऊन पळाल्याचे सांगितले़ पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीची तवेरा जप्त केली आहे़ दरोड्याचा अवघ्या बारा तासांत यशस्वी तपास करणारे सोनवणे यांच्यासह लासलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना दहा हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर करण्यात आले आहे़
लासलगाव पोलीस ठाण्यातील जनार्दन सोनवणे व गुन्हे शाखेने यांनी दरोड्याचा अवघ्या बारा तासांत यशस्वी तपास केला आहे़ यातील चौघे फरार संशयितांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, अहमदनगर जिल्ह्यांतील शेवगाव व भोसरी येथील दोघांचा समावेश असून, त्यांच्या तपासासाठी पोलीस पथक पाठविण्यात आले आहे़
- संजय दराडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक