सदोष मनुष्यवधाखाली पतीस सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:16 PM2017-09-12T23:16:51+5:302017-09-12T23:16:51+5:30
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस बेदम मारहाण केल्यानंतर जखमी पत्नीस उपचारासाठी दाखल न करता तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा व मृतदेह शिवाजीनगरला भावाच्या घरी टाकून पळ काढणारा पती रूपेश तुळशीराम गायकवाड (रा़मोरेमळा, पंचवटी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़१२) दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी या खटल्यात १७ साक्षीदार तपासले, तर सातपूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी या गुन्ह्याचा तपास केला़
पंचवटीतील मोरे मळ्यात रूपेश गायकवाड हा पत्नी मंगल व मुलगा उमेशसह राहत होता़ मद्याचे व्यसन असलेल्या रुपेशने ७ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण केली तसेच तिचे डोके भिंतीवर आदळून जखमी केले़ तसेच पत्नीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल न नेल्याने सकाळी तिचा मृत्यू झाला़ यानंतर पत्नीचा मृतदेह रिक्षातून आपला सख्ख्याभाऊ राहत असलेल्या सातपूर शिवाजीनगरमधील गणराज बिल्डिंगमध्ये ठेवून फरार झाला़
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खून तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी केला, तर न्यायालयात सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी १७ साक्षीदार तपासले़ विशेष म्हणजे या खटल्यात आरोपीचा मुलगा उमेश याने आपली साक्ष फिरवली मात्र वैद्यकीय अधिकारी, रिक्षाचालक व परिस्थितीजन्य पुरावे यानुसार रूपेश गायकवाड यास दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़