नाशकात चो-या करणा-या बुरखाधारी महिला गँगची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:04 PM2017-12-06T16:04:29+5:302017-12-06T16:08:51+5:30
नाशिक : सराफी दुकाने वा मोबाईल स्टोअरमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन वेगवेगळे प्रकार दाखविण्यास सांगून चोरी करणा-या तीन बुरखाधारी महिलांची गँग शहरात सक्रिय झाली आहे़ शहरातील एका सराफी दुकानातून सुमारे सव्वा लाख रुपयांच्या दागिण्यांची चोरी करण्यापुर्वी या गँगने उपनगरमधील एका मोबाईल दुकानातून मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे़
नाशिक : सराफी दुकाने वा मोबाईल स्टोअरमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन वेगवेगळे प्रकार दाखविण्यास सांगून चोरी करणा-या तीन बुरखाधारी महिलांची गँग शहरात सक्रिय झाली आहे़ शहरातील एका सराफी दुकानातून सुमारे सव्वा लाख रुपयांच्या दागिण्यांची चोरी करण्यापुर्वी या गँगने उपनगरमधील एका मोबाईल दुकानातून मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या बुरखा गँगमुळे शहरातील सराफी व मोबाईल दुकानादारांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी या बुरखाधारी गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़
नाशिक - पुणे रोडवरील पासपोर्ट आॅफीसशेजारी असलेल्या अे स्टार झोन मॉलमध्ये व्हॅल्युबल इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे़ १ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तीन बुरखाधारी महिला मोबाईल खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या़ या ठिकाणी विविध कंपन्यांचे मोबाईल दाखविण्यास सांगून एका महिलेने हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा एक्सपीरिया मोबाईल चोरून नेला़ दुकानातील मोबाईलमध्ये एक मोबाईल कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता बुरधारी महिलांपैकी एकीने फोन चोरल्याचे समोर आले़ याप्रकरणी मच्छिंद्रनाथ गायकवाड (शिवाजीनगर, सातपूर) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़
कॅनडा कॉर्नर परिसरातील विजय पंजवाणी यांच्या पोहूमल आर्ट ज्वेलरीमध्ये १ डिसेंबर रोजी सायंकाळी तीन बुरखाधारी महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या़ या बुरखाधारी महिलांनी मोठ्या किमतीची व विविध डिझाइनचे दागिने पाहण्याचा बहाणा केला़ दागिने पाहता पाहता या बुरखाधारी महिलांनी २२ तोळे सोन्याची चैन, ३८ लाँग मंगळसूत्र, ४५ शॉट मंगळसूत्र, तीन राशीघर, तीन राणीहार, सात नेकलेस, ५ गजरामाळ असे एक लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले़ या प्रकरणी विजय पंजवाणी यांनीसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़