नाशिकच्या धरणांतून पूर्ण क्षमतेने विसर्ग
By admin | Published: November 5, 2015 02:59 AM2015-11-05T02:59:47+5:302015-11-05T02:59:47+5:30
सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार सकाळपर्यंत १,४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. पाटबंधारे खात्याने कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचे नियोजन केल्यामुळे १५ दिवसांत टप्पाटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.
नदीकाठच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित करणे, पाणी चोरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबतच्या सूचना वीज व पोलीस खात्याला देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.
गंगापूर धरणातून पाच दिवस तीन हजार क्युसेस व सात दिवस दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा समूहातूनही तीन, पाच व पंधरा दिवसांपर्यंत जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणातून पाणी सोडण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नकार देत, आंदोलन सुरू केल्यामुळे तूर्त गंगापूर व गौतमी गोदावरी या दोन धरणांतून पाणी सोडले जात आहे. कश्यपी धरणात ९४५ दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे.
जिल्हा प्रशासनाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबतचा आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, पाटबंधारे खात्याला पाण्याची गळती रोखण्याबाबत बजावले आहे. गोदाकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बैठकीवर लोकप्रतिनिधींचा बहिष्कार
धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याने, त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बोलविलेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला, तसेच पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचे सुमारे १,५०० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे आ. निर्मला गावित यांनी सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनी सध्या वीस टक्के पाणीकपात करण्यात आली असून, दहा महिन्यांत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवताना नाशिकला मराठवाडा करू नका, असेही मुर्तडक म्हणाले.