नाशिक, जळगाव विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी विलंब, मात्र स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:24 AM2017-12-24T03:24:39+5:302017-12-24T06:35:22+5:30
नाशिक व जळगावची बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर शनिवारी सुरू झाली. मुंबईहून विमान दुपारी जळगावला पोहोचताच जळगावकरांनी जल्लोष केला. मुंबईहून निघालेले विमान नाशिकला संध्याकाळी सव्वा सात वाजता पोहोचले. तेथून ते पुढे पुण्याला रवाना झाले.
नाशिक/जळगाव : नाशिक व जळगावची बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर शनिवारी सुरू झाली. मुंबईहून विमान दुपारी जळगावला पोहोचताच जळगावकरांनी जल्लोष केला. मुंबईहून निघालेले विमान नाशिकला संध्याकाळी सव्वा सात वाजता पोहोचले. तेथून ते पुढे पुण्याला रवाना झाले.
पहिल्याच दिवशी जळगावच्या विमानाला अडीच तास तर नाशिकच्या विमानाला पाऊण तास विलंब झाला. पालकमंत्री गिरीश महाजन, खा. हेमंत गोडसे यांच्यासह अनेक जण नाशिकला विमानाची वाट पाहत उभे होते. या सेवेची दोन्ही शहरांना बºयाच काळापासून प्रतीक्षा होती.
नांदेड - अमृतसर सेवेस प्रारंभ
नांदेड व अमृतसर या ऐतिहासिक शहरांना शनिवारी एअर इंडियाच्या विमानसेवेने जोडण्यात आले. अमृतसर येथून निघालेले विमान दुपारी दीडच्या सुमारास उतरले. परतीच्या प्रवासात नांदेड येथून ८० प्रवासी रवाना झाले. सव्वा दोन तासांत हा प्रवास होणार आहे.
एअर डेक्कनच्या विमानाचे शनिवारी दुपारी सव्वा वाजता जळगावला आगमन होणार होते, ते ३ वाजून ४८ मिनिटांनी आले. मुंबई विमानतळावरच जागा न मिळाल्याने विमानाला तेथून निघायलाही विलंब झाला. जळगावात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विमानसेवा सुरू झाली. एअर डेक्कनचे संचालक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते.
दुसºया टप्प्यात राज्यातील आणखी ५ शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणार आहे. सर्वसामान्यांना विमानसेवा मिळावी हे जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन व माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याचा आनंद कॅ. गोपीनाथ यांनी व्यक्त केला.