राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’, २७ नोव्हेंबरला आंदोलन : नागपूरला होणार समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:58 AM2017-11-16T02:58:43+5:302017-11-16T04:12:09+5:30
भाजपा सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सातारा ते कराड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
मुंबई : भाजपा सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सातारा ते कराड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन केले जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शेतकºयांची प्रत्यक्षातील कर्जमाफी आणि कर्जमाफी मध्ये असलेली तफावत, राज्यातील युवकांना दरवर्षी रोजगाराची आमिषे, राज्यातील महिलांना वाटणारी असुरक्षितता आणि त्यामुळे राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, सांगलीत पोलिसांनीच आरोपीचा खून करणे यामुळे पोलिसांवरचा उडालेला विश्वास व इतर मुलभुत प्रश्नांवर भाजपाचे सरकार अपयशी ठरले असून सरकारच्याविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यायातून १ डिसेंबर ते १० डिसेंबर दिंडी-पदयात्रा काढण्यात येणार आहे. १४५ किलो मिटरची ही पदयात्रा दिनांक ११ डिसेंबर रोजी विधानभवन नागपूर येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित रहणार आहेत. पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातून सुरु होवून पवना-वर्धा मार्गे नागपूरला संपेल.
या पदयात्रेत विधीमंडळ नेते अजित पवार, विधीमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
शरद पवार राहणार उपस्थित-
सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी हल्लाबोल आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. ते ११ डिसेंबर रोजी विधानभवन नागपूर येथे पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.