पंढरपूरात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी
By admin | Published: June 27, 2016 11:06 PM2016-06-27T23:06:15+5:302016-06-27T23:06:15+5:30
आषाढी यात्रा कालावधीत १४ ते १९ जुलै या कालावधीत पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारे राष्ट्रीय पातळीवरील कृषी पंढरी हे कृषी
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत १४ ते १९ जुलै या कालावधीत पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारे राष्ट्रीय पातळीवरील कृषी पंढरी हे कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बाजार समितीच्या आवारात भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या प्रदर्शनात ४०० स्टॉल उभारले जाणार असून आषाढी यात्रा काळात किमान ५ लाख शेतकरी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतील.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आ. प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी संजय तेली, तहसिलदार नागेश पाटील, बाजार समितीचे सभापती पोपट रेडे, उपसभापती संतोष घोडके, सचिव कुमार घोडके यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत.
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आषाढी यात्रेदरम्यान भरत असल्याने या प्रदर्शनाला राज्यातील सुमारे पाच लाख शेतकरी भेट देणार आहेत. त्या अनुशंगाने सी. सी. टीव्ही यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा व पायाभूत सुविधा बाजार समितीच्या आवारात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी बाजार समिती आवारात भव्य मंडप उभारण्यास सुरवात झाली आहे. वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणेनुसार प्रत्येक वारकऱ्यांना एक रोपटे या प्रदर्शनातच देण्यासाठी जिल्ह्यातील वनविभाग कामाला लागला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, कृषी राज्यमंत्री राम शिंदे उपस्थित राहणार असल्याने प्रदर्शनाची भव्यता लक्षात घेवून नियोजन करण्यात येत आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये राज्य कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री पीकविमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, यांत्रिकीकण या विषयावर सादरीकरण व मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, राज्य बियाणे मंडळ, कृषी उद्योग विकास मंडळ, राज्य वखार मंडळ, कृषी, पानलोट यासह अनेक विभागांचे स्टॉल व प्रात्यक्षिके सादर केली जाणार असल्याचे सभापती पोपट रेडे यांनी सांगितले.
शासनाच्या विविध विभागांनी समन्वय ठेवून या कृषी प्रदर्शनाचे नियोजन केले तर शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळेल. त्या अनुशंगाने सर्व विभाग कामाला लागले आहेत.
कृषी प्रदर्शनात ४०० स्टॉल
शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या शेतकरी भाविकांना पहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये ४०० स्टॉलचा समावेश करण्यात आला आहे. कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव व विविध कृषी तज्ज्ञांची चर्चासत्रे यामध्ये आयोजित केली आहेत. शासनाच्या विविध विभागांसाठी १०० स्टॉल लावण्यात येणार आहेत. प्रदर्शनातील स्टॉल बुकिंग अंतीम टप्प्यात आले असून आजवर २१० स्टॉलची नोंदणी झाली आहे. शेतीपूरक स्टॉल व मार्गदर्शन होणार असल्याचे प्रदर्शनाचे व्यवस्थापक संदीप गिड्डे यांनी सांगितले.
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. शेतीतील परराष्ट्रीय तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे. आ. प्रशांत परिचारक हे या कृषी प्रदर्शनाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. दुष्काळी परिस्थिती असली तरीही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे. बाजार समिती व कृषी विभाग, वन विभागाच्या वतीने तयारी सुरू झाली आहे.
- संतोष घोडके
उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर