‘रत्न’कन्येला खो-खोमधील राष्ट्रीय पुरस्कार

By Admin | Published: October 12, 2014 10:57 PM2014-10-12T22:57:09+5:302014-10-12T23:30:46+5:30

रत्नागिरीची सुकन्या : ऐश्वर्या सावंत मुंबई, पुण्याबाहेरील पहिली खेळाडू

National award in 'Kho Kho' for 'Ratna' | ‘रत्न’कन्येला खो-खोमधील राष्ट्रीय पुरस्कार

‘रत्न’कन्येला खो-खोमधील राष्ट्रीय पुरस्कार

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरीच्या लाल मातीत घडलेल्या ऐश्वर्या यशवंत सावंत हिने भारतातील सर्वोत्कृष्ट खो-खोपटूसाठी असलेला जानकी पुरस्कार पटकावून रत्नागिरीची शान वाढवली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार पटकावणारी मुंबई, पुण्याबाहेरील ती पहिली खेळाडू ठरली आहे.
रत्नकन्या ऐश्वर्या सावंत हिची ही कामगिरी थक्क करणारी आहे. तिने खो-खो मध्ये केलेल्या या कामगिरीने अनेकांनी तिचे कौतुक केले. ऐश्वर्याने शालेय जीवनापासून खो-खोमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच अजमेर, राजस्थान येथे ३३व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्राच्या मुले व मुली संघाने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. दोन्ही संघानी गतविजेत्या कर्नाटकचा पराभव करून हे यश संपादन केले. नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलींच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करीत तिसरा क्रमांक संपादन केला होता. यावेळी ऐश्वर्या सावंतची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
अजमेर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या फेरीच्या सामन्यापासून ऐश्वर्या सावंतने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. तिच्या या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असलेल्या जानकी पुरस्काराने तिला गौरविण्यात आले.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असलेल्या ऐश्वर्याने यापूर्वी तीन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पंकज नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरु असून, विशेष म्हणजे या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंकज नार्वेकर हेच महाराष्ट्र मुलींच्या संघाचे प्रशिक्षक होते.
तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या उपाध्यक्ष नेत्रा राजेशिर्के, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, रत्नागिरी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष नाना मयेकर, सरचिटणीस संदीप तावडे, उपाध्यक्ष विनोद मयेकर, प्रसन्न आंबुलकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. विनोद शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
ऐश्वर्या हिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. विविध स्तरावर खेळताना तिने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे मुलींच्या संघाने विविध स्तरावर यश मिळवले आहे. त्याची दखल घेऊन भारतीय खो-खो फेडरेशनने ऐश्वर्याला हा पुरस्कार जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)

ऐश्वर्याची वाटचाल थक्क करणारी.
शालेय जीवनापासूनच ऐश्वर्याची चमकदार कामगिरी.
अजमेर येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत राज्याच्या संघाने पटकावले सुवर्णपदक.
ऐश्वर्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे महाराष्ट्र संघ ठरला अजिंक्य.

Web Title: National award in 'Kho Kho' for 'Ratna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.