राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?
By admin | Published: July 29, 2016 05:52 PM2016-07-29T17:52:55+5:302016-07-29T17:52:55+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत.
केंद्र सरकारची गाईडलाईन नाही : मार्च २०१७ पर्यंत कंत्राटपद्धतीने करार
अमरावती, दि. २९ : राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याचे संकेत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सुरूआहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालये स्थापिन करण्यात आले असून या अभियानावर जिल्हा शल्य चिकित्सकांचे नियंत्रण आहे. मात्र, हे अभियान राज्यात ३१ मार्च २०१७ नंतर सुरु राहील की नाही? याबाबत अद्यापही स्पष्ट धोरण प्राप्त झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
अभियान बंद झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभागात अगोदरच शेकडो पदे रिक्त असल्यामुळे आरोग्यसेवेवर मोठा परिणाम जाणवेल, हे वास्तव आहे. राज्यात आरोग्य अभियान हे सन २००५ मध्ये सुरु करण्यात आले. हा टप्पा सन २०१२ मध्ये संपुष्टात आला. या सात वर्षांच्या कालावधीत आरोग्यसेवा सर्वच स्तरावर पुरविण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्पा १ एप्रिल रोजी २०१२ रोजी सुरू झाला असून ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे.
हे अभियान सुरू ठेवायचे की नाही? याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहेग. मात्र, केंद्र सरकारकडून या अभियानाबाबत सुस्पष्ट धोरण निश्चित होत नसल्याने ३१ मार्च २०१७ नंतर राष्ट्रीय अभियान गुंडाळले जाते काय? याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय अभियानात राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांना ११ महिन्यांची पुनर्नियुक्ती दिली जाते.
परंतु सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे कंत्राट ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे तर दुसरीकडे या राष्ट्रीय अभियानाचा उद्देश पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या अभियानाला मुदतवाढ मिळेल अथवा नाही? याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ३१ मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती द्यायची असल्यास त्यासाठी शुद्धिपत्रक काढून द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय अभियान सहसंचालक संजीव जाधव यांनी दिल्या आहेत.
अशी आहे ८२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात एकूण ८२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात लॅब टेक्निशियन, परिचारिका, फार्मासिस्ट, तालुका अकाऊंटंट, डाटा एन्ट्री आॅपरेटर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा लेखाधिकारी, समूह संघटक असे २२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कामावर आधारित मोबदला पद्धतीने ६० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. ३१ मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती न मिळाल्यास यासर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येईल, असे संकेत आहे.
‘‘ राष्ट्रीय आरोग्य अभियानाबाबतचे नवे धोरण प्राप्त झाले नाही. मात्र, तसे काही असल्यास अंमलबजावणी केली जाईल. या अभियानात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत.
- अरुण राऊत,
शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय