४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:24 PM2020-07-25T14:24:37+5:302020-07-25T14:31:01+5:30
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं.
सांगली – भौसे येथील ४०० वर्ष जुना वटवृक्ष तोडण्याला विरोध झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चं काम सुरु असताना या मार्गात येणाऱ्या ४०० वर्ष जुना वटवृक्ष तोडावा लागणार होता. मात्र स्थानिकांनी याचा विरोध करत चिपको आंदोलन केले होते.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं. सोशल मीडियातही अनेक पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष तोडण्यास विरोध केला होता. अखेर या सर्व प्रकाराची दखल घेत नितीन गडकरींनी महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातो. गावातील गट क्रमांक ४३६ इथं यलम्मा देवीचं मंदिर असून त्यासमोर ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा असून तो वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षांसाठी नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे, असं आदित्य यांनी गडकरींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. वटवृक्षाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संबंधित जागेवरील महामार्गाचं संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचं जतन करण्याची विनंती आदित्य यांनी केली होती.
चारशे वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी चिपको आंदोलन सुरू केलं होतं. आजपर्यंत या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यावरील अनेक झाडं तोडली गेली. त्याला कोणी विरोध केला नाही. मात्र ४०० वर्षांहून अधिक जुना वटवृक्ष असल्यानं त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवारानं वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती.
गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी महामार्गाचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याबद्दल गडकरी यांचं कौतुकदेखील केलं होतं. या महामार्गाचा परिसरातल्या शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल. त्याबद्दल आपला आभारी असल्याचं ठाकरेंनी पत्रात म्हटलं होतं. आता हे पत्र आणि स्थानिकांच्या मागणीची दखल घेत नितीन गडकरींनी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'
...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड