‘महावितरण’तर्फे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
By admin | Published: July 5, 2015 11:30 PM2015-07-05T23:30:03+5:302015-07-06T00:34:36+5:30
बुधवारी प्रारंभ : कोल्हापूरला प्रथमच मान
कोल्हापूर : चाळिसाव्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कबड्डी (पुरुष) स्पर्धेचे आयोजन ‘महावितरण’च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने केले जाणार आहे. अशा प्रकारचा मान कोल्हापूर परिमंडळ विभागास प्रथमच मिळत आहे. या स्पर्धेत देशभरातील २२ वीज कंपन्यांमधील संघ सहभागी होणार असून, या स्पर्धा बुधवार (दि. ८) ते शनिवार (दि. ११) दरम्यान कोल्हापुरात होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्यावतीने दरवर्षी देशातील वीज कंपन्या तसेच वीज मंडळांतर्गत वेगवेगळ्या क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांत घेतल्या जातात. यावर्षी ४०व्या अखिल भारतीय कबड्डी (पुरुष) स्पर्धा आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र राज्यात महावितरणला मिळाला आहे. महावितरणच्यावतीने या स्पर्धा कोल्हापुरात घेतल्या जाणार आहेत. स्पर्धा बुधवार (दि. ८) ते शनिवार (दि. ११) दरम्यान घेतल्या जाणार असून, या स्पर्धेत देशातील २२ वीज कंपन्यांमधील संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे कार्यकारी संचालक (एचआर) यांच्या हस्ते, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत मुस्कान लॉन येथे दि. ८ जुलै रोजी होणार आहे. स्पर्धा चार गटांत साखळी पद्धतीने खेळविली जाणार आहे. बक्षीस समारंभ महावितरणचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक ओमप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.पत्रकार परिषदेवेळी अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर, उपमहाव्यवस्थापक मोहन चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड, आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे यंदा ४0 वे वर्ष ---२२ संघ होणार सहभागी----शनिवारी समारोप