राष्ट्रीय अवयवदान दिन: ५ हजार लोकांना किडनीदानाची प्रतीक्षा; १,२८४ रुग्ण लिव्हर, तर १०८ जणांना हवंय हृदय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:57 PM2023-08-03T14:57:21+5:302023-08-03T14:58:13+5:30
सध्याच्या घडीला राज्यातील अवयवनिहाय रुग्णांची प्रतीक्षा यादी पाहिली, तर ‘किडनी’ या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयवदान विषयावर जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असले, तरीही अवयवदानाची मोहीम अजून संथ गतीने सुरू आहे. या मोहिमेला बळ मिळण्यासाठी शासनासोबत सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सध्याच्या घडीला राज्यातील अवयवनिहाय रुग्णांची प्रतीक्षा यादी पाहिली, तर ‘किडनी’ या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.
जुनाट किडनी आजाराने दोन्ही किडन्या निकामी होतात. सर्व उपचार करून झाल्यानंतरही ज्यावेळी किडनी उपचारांना प्रतिसाद देत नाही, त्यावेळी किडनी अवयवाचे प्रत्यारोपण हा एकाच पर्याय असतो, अन्यथा रुग्णांना कायमस्वरूपी डायलिसिस करावे लागते. त्यामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते, तर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने मानवासाचे आयुर्मान वाढत असून, सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. त्यासोबत आता लिव्हर आणि हृदय अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांत मोठी वाढ झाली आहे, तसेच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, पण आता राज्यात होऊ लागल्या आहेत. देशात मानवी अवयव आणि उती प्रत्यारोपण कायदा, १९९४ नुसार मानवी शरीरात प्रत्यारोपण केले जाते. एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदानातून ८ जणांचे जीव वाचवू शकते.
अवयवनिहाय राज्यातील रुग्णांची प्रतीक्षा यादी
किडनी - ५,८३२
लिव्हर - १,२८४
हृदय - १०८
फुप्फुस - ४८
स्वादुपिंड - ३५
छोटे आतडे - ३
हात - ३
मुंबईतील वर्षनिहाय अवयवदान
वर्ष अवयवदान
२०२० ३०
२०२१ ३३
२०२२ ४७
वर्ष अवयवदान
२०२० ७४
२०२१ ९५
२०२२ १०५
हार्ट ट्रान्सप्लांट केईएममध्ये सुरू होणार
महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात येत्या सहा महिन्यांत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णलयाच्या
- अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित सगळ्या गोष्टी एकाच छताखाली येण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांनी ट्रान्सप्लांट युनिव्हर्सिटी सुरू केल्या आहेत, तशा युनिव्हर्सिटी आपल्याकडे सुरू करता येऊ शकतात का, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अवयवदान जनजागृतीपासून ते अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सगळ्या गोष्टी या युनिव्हर्सिटीतर्फे केल्या जातात. किडनी अवयवांसाठी प्रतीक्षा यादी मोठी आहे. गेल्या काही वर्षांत अवयवदान चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मात्र, ही चळवळ अधिक व्यापक होण्याची गरज आहे. अजून मोठ्या संख्येने सामाजिक संस्थांनी पुढे येऊन, या अवयवदानाबाबत जनजागृती केली पाहिजे.
- डॉ. सुजाता पटवर्धन, संचालिका, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था