राणीबाग तिकीटवाढीवरून राजकीय आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 02:21 AM2017-05-12T02:21:31+5:302017-05-12T02:21:31+5:30
राणीबागेतील तिकीट दरवाढीवरून राजकीय आखाडा रंगला आहे. स्थानिक भाजपाच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी दरवाढीविरोधात परिसरात निषेधाचे फलक झळकवले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राणीबागेतील तिकीट दरवाढीवरून राजकीय आखाडा रंगला आहे. स्थानिक भाजपाच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी दरवाढीविरोधात परिसरात निषेधाचे फलक झळकवले आहेत. तर मनसेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना निवेदन देत, संपूर्ण उद्यानाला लावलेली दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात लोखंडे म्हणाल्या की, भायखळा परिसरात मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिक राहतात. त्यांच्या मासिक पासात थेट ३० रुपयांहून १५० रुपयांपर्यंत वाढ केलेली आहे. ही वाढ अन्यायकारक असून, पेंग्विन दर्शनाचा भार या नागरिकांवर लादू नये, अशी नागरिकांची भूमिका आहे. अद्याप, उद्यानाचा कायापालट झालेला नसताना, सर्वसामान्य मुंबईकरांवर ही दरवाढ लादणे अन्यायकारक आहे. आधी विकास करा, मग दरवाढीचा प्रस्ताव सादर करावा, असे लोखंडे यांचे म्हणणे आहे. लिपारे म्हणाले की, तिकीट दरवाढीला मनसेचा विरोध नाही.
मात्र, केवळ पेंग्विन दर्शनासाठी ही दरवाढ लादणे चुकीचे आहे. यामुळेच केवळ पेंग्विन दर्शनाच्या ठिकाणी स्वतंत्र तिकीट आकारण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यासाठीही थेट १०० रुपये न आकारता प्रौढांसाठी ३० रुपये, तर लहान मुलांसाठी १० रुपये आकारण्यात यावेत. उद्यानाच्या तिकीट दरात नाममात्र म्हणून प्रौढांसाठी १०, तर लहान मुलांसाठी ५ रुपये दरवाढ करता येईल.