नॅशनल पार्कचे रेस्क्यू पथक अवनीच्या बछड्यांना शोधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:55 AM2018-11-17T06:55:52+5:302018-11-17T06:56:28+5:30
१३ जणांचा बळी घेणारी पाच वर्षीय वाघीण अवनीला ठार केल्यावर, तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद
मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम अवनी वाघिणीच्या बछड्यांचा शोध घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागात दाखल झाली आहे. १५ नोव्हेंबर रोजी नॅशनल पार्कमधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि कर्मचारी रवाना झाल्याचे उद्यान प्रशासनाने सांगितले.
१३ जणांचा बळी घेणारी पाच वर्षीय वाघीण अवनीला ठार केल्यावर, तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोणीच्या जंगलातील बेस कॅम्पमधून ही शोधमोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत वनविभागाच्या पथकाने सराटी, बोराटी, वरुड आणि भुलगड आदी भागांतील जंगल परिसर पिंजून काढला, परंतु दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाहीत. त्यांना कसे जेरबंद करायचे, हा प्रश्न आता वनविभागासमोर आहे. आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यातून पुन्हा मनुष्यहानी होऊ शकते, अशी शंका प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा हे मध्यंतरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आले होते. मिश्रा यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान इतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमलाही पांढरकवडा येथे बोलावण्यात आले. सध्या बछड्यांचे लोकेशन शोधण्याचे काम हाती घेण्यात आले असून वरिष्ठांच्या आदेशावरून ही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली.
‘बछड्यांना बेशुद्ध करणार’
अवनीच्या दोन बछड्यांना बेशुद्ध (डार्टिंग) करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या वेळी ते बछडे आढळून येतील, तेव्हा त्यांना बेशुद्ध केले जाईल. तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. १०० किलोमीटर परिघात जंगल पसरले आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.