देशहित सर्वोच्च
By admin | Published: August 5, 2015 01:22 AM2015-08-05T01:22:23+5:302015-08-05T01:22:23+5:30
टायगर मेमनच्या गुन्हयाची शिक्षा याकुब मेमनला दिली, याकुबची कायदेशीरित्या हत्या केली गेली हे गैरसमज आहेत. आपल्या देशाची न्यायव्यवस्था एकाने केलेल्या
मुंबई : टायगर मेमनच्या गुन्हयाची शिक्षा याकुब मेमनला दिली, याकुबची कायदेशीरित्या हत्या केली गेली हे गैरसमज आहेत. आपल्या देशाची न्यायव्यवस्था एकाने केलेल्या गुन्हयाची शिक्षा दुसऱ्याला देत नाही. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अमलबजावणी करणे म्हणजे आपण खुनीही ठरत नाही, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी मांडली.
ललीत दोशी मेमोरीअल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘स्टेट सिक्युरीटी, स्टेटक्राफ्ट अॅण्ड कॉन्फ्लीक्ट आॅफ वॅल्यूज’ या विषयावर डोवल यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानात देशहितार्थ झटताना आणि वैयक्तिक जीवनातील मुल्यांचा संघर्ष, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन या मुद्यांना हात घातला. डोवल यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आजीमाजी आयपीएस अधिकारी यंशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित होते. त्यात सुपर कॉप ज्युलीओ रिबेरोंसह पी. एस. पसरिचा, अनामी रॉय, राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसाळकर, मुंबइचे आयुक्त राकेश मारिया, सहआयुक्त देवेन भारती यांचा समावेश होता.
राष्ट्राचे हित सर्वोच्च आहे. त्यासाठी केली जाणारी प्रत्येक तडजोड, त्याग योग्यच आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात ठराविक मुल्ये जपतो, तत्वांच्या आधारे पुढील मार्गक्रमण करतो. पण देशहितार्थ झटताना या मुल्यांशी, तत्वांशी संघर्ष करावा लागतो. तेव्हा काय करू, हे करू की ते, अशी द्वीधा मनस्थिती निर्माण होते. तेव्हा देशहिताचा मार्ग निवडण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे मत डोवल यांनी मांडले. देशाचे संरक्षण हे प्रथम कर्तव्य आहे. जनतेच्या रक्षणासोबतच प्रांतिक, धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक एकात्मता राखणे हेही महत्वाचे आहे. मात्र हा हेतू साध्य करताना मूल्यांशी संघर्ष हा आपोआपच ओढवतो. तेव्हा देशहित सर्वोच्च मानायला हवे, असेही डोवल यांनी सांगितले.
आजच्या परिस्थितीत कोणत्याही देशाला युद्ध करणे परवडणारे नाही. पुढला काळ हा मनांवर राज्य करणाऱ्यांचा असेल, असे संकेतही त्यांनी दिले. आपल्या देशाचे लष्कर, गुप्तहेर संघटना सक्षम व समर्थ असूनही दाऊद इब्राहिम मोकाट कसा, या प्रश्नावर उत्तर देताना डोवल म्हणाले, एका गुंडासाठी लष्कर कसे काय तैनात करावे. त्याच्यासाठी जे उपाय योजायचे ते आम्ही निश्चित योजू. या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी भुषविले.