राष्ट्रीय मतदार दिन : महाराष्ट्राचा पहिला मतदार ‘विकास के उस पार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:16 AM2018-01-26T03:16:11+5:302018-01-26T03:16:17+5:30
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आणि नर्मदेच्या पाणलोट क्षेत्रात बेट म्हणून तयार झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली येथील वसंत बिज्या वसावे याला महाराष्ट्राचा आणि देशाचाही पहिला मतदार म्हणून गुरुवारी मतदान दिनाचे औचित्य साधून गौरव झाला.
रमाकांत पाटील
नंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आणि नर्मदेच्या पाणलोट क्षेत्रात बेट म्हणून तयार झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली येथील वसंत बिज्या वसावे याला महाराष्ट्राचा आणि देशाचाही पहिला मतदार म्हणून गुरुवारी मतदान दिनाचे औचित्य साधून गौरव झाला. मात्र, जिल्हा मुख्यालयी येण्याकरिता बोट, गाडी व रिक्षा असा एकूण किमान २४ तास प्रवास करून यावे लागले. यावरूनच पहिला मतदार विकासाच्या मुख्य प्रवाहापासून किती लांब असल्याचे चित्र स्पष्ट होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या क्रमवारीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघ व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे साहजिकच मतदार यादीत पहिले नाव येण्याचे भाग्य अक्कलकुवा मतदारसंघातील मतदाराला मिळते. वसंत बिज्या वसावे या युवकाला हा मान मिळाला आहे.
मणिबेली हे सरदार सरोवर प्रकल्पातील पहिले विस्थापित गाव. सात पाडे मिळून तिथे ५२१ लोक राहतात. हे गाव सरदार सरोवरच्या पाणलोटात असल्याने या गावाला चोहीबाजूने पाण्याचा वेढा आहे. वसंत वसावे यांचे घर सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाणलोटापासून १०० मीटर अंतरावर आहे.
सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांना निमंत्रण मिळाल्याने या कार्यक्रमासाठी ते बुधवारपासून घरून निघाले होते. साधारणत: तासभर बोटीतून प्रवास करून ते केवडिया कॉलनीला आले. तेथून रिक्षाने १५ किलोमीटर केवडिया स्थानकापर्यंत गेले. तेथून बसने सहा तास प्रवास करून अक्कलकुव्याला आले. तेथे मुक्कामी थांबल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी नंदुरबार या जिल्ह्याच्या मुख्यालयी आले. त्यांच्या गावात वीज नाही, एसटी नाही, इतर सुविधा तर लांबच.
वसंत वसावे हे निरक्षर असून उदरनिर्वाहासाठी नर्मदेत मासेमारी करतात. त्यांना पाच मुले आहेत. सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित घोषित म्हणून जाहीर व्हावे यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.
देशातील आणि महाराष्टÑातीलही पहिला मतदार म्हणून माझा गौरव झाला, त्याचा खूप आनंद वाटला. पण या गौरवाबरोबरच माझ्या गावाचेही प्रश्न सुटावे आणि मलाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे.
- वसंत बिज्या वसावे