पेनूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भीमा आघाडी
By admin | Published: February 16, 2017 07:08 PM2017-02-16T19:08:46+5:302017-02-16T19:08:46+5:30
पेनूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भीमा आघाडी
पेनूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भीमा आघाडी
मोहोळ : आॅनलाईन लोकमत सोलापूर
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून, काही ठिकाणचा अपवाद वगळता भीमा परिसर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा दुरंगी सामनाच रंगला आहे.
सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समितीच्या निवडणुकीत चुरशीचा असणारा पेनूर जि.प. गट हा राखीव झाला असून, या गटात भीमा परिसर विकास आघाडीने तरुणाला संधी देत तेथे सोमेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सेवानिवृत्त प्राध्यापक शिवाजी सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दलित चळवळीत काम करणारे संजीव खिलारे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अन्य पाच असे आठ उमेदवार रिंगणात उभे आहेत.
जरी आठ उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरा सामना भीमा परिसर विकास आघाडीचे उमेदवार सोमेश क्षीरसागर व राष्ट्रवादीचे शिवाजी सोनवणे यांच्यातच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पेनूर जि.प. गटात पेनूर गण व टाकळी सिकंदर असे दोन गण आहेत. गटात एकूण ११ गावे आहेत तर ३० हजार १४ मतदार आहेत. या जि.प. गटात पेनूर, पाटकूल, आढेगाव, तांबोळे, नजीकपिंपरी, टाकळी, वरकुटे, अंकोली, सौंदणे, औंढी, शेजबाभूळगाव आदी ११ गावांचा समावेश आहे.
भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून गत पंचवार्षिक व चालू निवडणुकीत भीमा सह. साखर कारखान्याची एकहाती सत्ता आणण्यात महाडिक यांना यश आले आहे. गत जि.प. निवडणुकीत हा गट आघाडीच्याच ताब्यात होता. या गटात आघाडीच्या माध्यमातून शिवसेनाही महाडिक यांच्याबरोबर आहे. शिवाय राष्ट्रवादीच्याच एका गटाचे नेते राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे आघाडीसोबत आहेत. तर दुसरीकडे गेली २० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजन पाटील यांनी आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यात केलेली कामे सहकाराच्या माध्यमातून दूध संघ सोसायट्याच्या माध्यमातून केलेले काम व लोकनेते बाबुराव आण्णांना मानणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता याच्या जीवावर राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वजण एक झाले असतानाही या सर्वांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
भाजपाचा लढा
४तर दुसरीकडे महाआघाडीसोबत सूत न जुळल्याने ऐनवेळी भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले त्यामध्ये पेनूर गटात भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष संजीव खिलारे यांना उमेदवारी देऊन भीमा परिसर आघाडी व राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. या भागात भाजपाची ताकद जरी कमी असली तरी भाजपाला मिळालेला उमेदवार पाहता भाजपाही कासव गतीने मैदानात उतरली आहे. याशिवाय काँग्रेसमधून दत्तात्तय घोडके अपक्ष म्हणून दादाराव पवार, रासपमधून अतुल मोरे, भारिप बहुजन मधून प्रकाश सोनटक्के तर बसपातून प्रेमनाथ सोनवणे असे आठ उमेदवार उभे आहेत, परंतु खरी लढत भीमा परिसर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे.