राष्ट्रवादी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध
By admin | Published: July 5, 2017 03:23 AM2017-07-05T03:23:20+5:302017-07-05T03:23:20+5:30
महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणारे प्रमोद साठे हे सराईत गुन्हेगार असून,
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणारे प्रमोद साठे हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ती व्यक्ती खुनातील आरोपी असून, एका अंडरवर्ल्ड डॉन टोळीतील गुंड आहे. स्थायी समितीच्या एका माजी सभापतीने व विद्यमान नगरसेवकाने साठे यांच्याशी संगनमत करून खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. साठे हे राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांचे कुटुंब सांभाळतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड झाले आहे, अशी टीका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली. या आरोपाचा राष्ट्रवादीने इन्कार केला आहे.
टक्केवारीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जुंपली आहे. टक्केवारीसाठी भाजपाचे पदाधिकारी बिले अडवीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यास भाजपाने उत्तर दिले आहे. तक्रार देणारी व्यक्ती कोण आहे? याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी महापौर आझम पानसरे, भाजपा सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘महापालिकेतील ठेकेदारांना आतापर्यंत नियमबाह्यपणे बिले दिली जात होती. मात्र, भाजपाने सत्तेत आल्यानंतर यापुढे कायद्यातील तरतुदीनुसारच बिले देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याबाबत ठेकेदारांना कोणतीही अडचण नाही. मात्र, ठेकेदारांच्या आडून नियमबाह्यपणे पैसे कमविण्याचा धंदा चालविलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपा नियमाने वागत आहे, हे रूचलेले नाही. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामांचे पैसे महापालिकेत अडकल्यामुळे ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिले मिळावीत, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
साठे यांनी ठेकेदारांची बिले देण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रारही राष्ट्रवादीच्या दबावाचाच एक भाग आहे. साठे हे ना महापालिकेचा ठेकेदार आहेत ना शहरातील
रहिवासी आहेत. ना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले आहेत.
तरीही त्यांनी केलेल्या तक्रारीची
दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले. साठे हे आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खुनातीलआरोपी असून, त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन टोळीशी संबंध आहे. ’’
साठे कोण आहे? काय आहे याबद्दल आम्हाला रस नाही. त्यांनी एक नागरिक म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची चौकशी व्हावी. दोषी नसतील तर सिद्ध करावे. पत्रकार परिषदेस उपस्थित असणाऱ्यांचा भूतकाळ काय आहे, हेही तपासण्याची गरज आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे. राष्ट्रवादीचे जर अंडरवर्ल्डशी संबंध असतील भाजपाचे त्यापुढे जाऊन जगातील गुन्हेगारांशी संबंध आहेत. तुम्ही किती साजूक तुपातले आहेत.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
२००७ मध्ये माझा मोका डिस्चार्ज झाला आहे. कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मी एक व्यावसायिक आहे. मी मूळचा संघाचा आहे. भाजपा काय आहे, हे राष्ट्रवादीतून आलेल्यांनी शिकवू नये. राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाराची परंपरा भाजपातही सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे मी भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती. हे प्रकरण आता वैयक्तिक आरोपांवर आले आहे. भ्रष्टाचार लपविण्यासाठी माझा संबंध राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. भाजपातील नेत्यांवर किती गुन्हे दाखल होते हे सांगितले तर अवघड होईल. - प्रमोद साठे, तक्रारदार
फौजदारी दाखल करणार
खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहाची हवा खाऊन आलेल्या राष्ट्रवादीच्या एका माजी स्थायी समिती सभापतीचा जवळचा मित्र आहे. या माजी स्थायी समिती सभापतीला आपल्या प्रभागात बिले नियमाप्रमाणे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे खोटी तक्रार
करण्यास भाग पाडले. राष्ट्रवादी आणि अंडरवर्ल्डचे संबंध उघड
झाले आहेत. मनमानेल त्या पद्धतीने कामे करून करदात्यांच्या पैशांची लूट करत होते. मात्र, आता त्याला चाप बसली आहे.पक्षाची बदनामी केली म्हणून फौजदारी दाखल करणार आहोत, असेही जगताप यांनी सांगितले.