सिटी लाइफलाइनच्या कंत्राटाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

By Admin | Published: March 10, 2017 02:40 AM2017-03-10T02:40:10+5:302017-03-10T02:40:10+5:30

ठाणे महापालिकेची कृपादृष्टी असलेल्या सिटी लाइफलाइनचे कंत्राट अडचणीत आले असून, त्याविरोधात ‘लोकमत’ने घेतलेल्या भूमिकेनंतर आता ठाण्याच्या राजकीय वर्तुळातही

Nationalist Congress Party will go against City Lifeline contract | सिटी लाइफलाइनच्या कंत्राटाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

सिटी लाइफलाइनच्या कंत्राटाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिकेची कृपादृष्टी असलेल्या सिटी लाइफलाइनचे कंत्राट अडचणीत आले असून, त्याविरोधात ‘लोकमत’ने घेतलेल्या भूमिकेनंतर आता ठाण्याच्या राजकीय वर्तुळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. सिटी लाइफलाइनला दिलेल्या या चुकीच्या कंत्राटाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. मनसेनेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर ठाण्यातील दक्ष नागरिकांनीही या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेने २०१५मध्ये जेएनएनयूआरएमअंतर्गत १९० बस खरेदी केल्या आहेत. या बस ठाणे व मुंबई महानगर प्रदेशात शहर बससेवेसाठी वापरायच्या होत्या. त्यासाठी प्रति किमी दराने चालविणारा खासगी ठेकेदार पालिकेला हवा होता. त्यानुसार सिटी लाइफलाइनला हे कंत्राट देण्यात आले. प्रत्यक्षात शेजारच्याच नवी मुंबई महापालिकेने अशा स्वरूपाच्या मिडी बससाठी किलोमीटरमागे ३१ रुपये देऊ केले आहेत, तर ठाणे महापालिकेने यासाठीच तब्बल ५३ रुपये मोजले आहेत. तर स्टॅण्डर्ड बससाठीचा प्रति किलोमीटरचा दर नवी मुंबईने ५९ रुपये दिला असून, ठाणे महापालिकेने मात्र त्यासाठी तब्बल ६६ रुपये दिले आहेत. शेजारच्याच महापालिकेने अशा पद्धतीने दर दिले असताना ठाणे महापालिकेने मात्र या कंपनीवर एवढी कृपा कशासाठी केली, असा सवाल ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. कंत्राटाच्या सुरुवातीला जी अनामत रक्कम घेणे अपेक्षित होते, ती नवी मुंबईच्या तुलनेत कमी घेतली असून, ती अवघी पाच टक्के एवढीच आहे. एकूणच बस चालविण्यास देण्याच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पालिकेने चुकीच्या पद्धतीने दिलेल्या कंत्राटामुळे पालिकेला पुढील १० वर्षांत तब्बल ५०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याविरोधात आवाज उठविला असून, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

संबंधित कंपनीला चुकीच्या पद्धतीने ठेका देण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.
- आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँगे्रस, ठाणे शहर, अध्यक्ष

या कंत्राट प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. यात जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
- अविनाश जाधव, मनसे अध्यक्ष, ठाणे शहर

पालिका अशा पद्धतीने आमच्या पैशांची उधळपट्टी करणार असेल तर ते चुकीचे आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वेळ पडल्यास आम्हीही ठाणेकरांच्या हितासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. - चंद्रहास तावडे, दक्ष नागरिक

Web Title: Nationalist Congress Party will go against City Lifeline contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.