राष्ट्रवादीचा जाहीरनामा : पालिकेच्या शाळा अद्ययावत करणार
By Admin | Published: February 16, 2017 06:36 PM2017-02-16T18:36:57+5:302017-02-16T18:36:57+5:30
राष्ट्रवादीचा जाहीरनामा : पालिकेच्या शाळा अद्ययावत करणार
राष्ट्रवादीचा जाहीरनामा : पालिकेच्या शाळा अद्ययावत करणार
सोलापूर आॅनलाईन लोकमत
गेली तीन टर्म काँग्रेसबरोबर सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्याच-त्या आणि जुन्या प्रश्नांना स्पर्श केले आहे. डबघाईला आलेल्या मनपा शाळा मात्र अद्ययावत करून तळागाळातील मुला-मुलींना चांगले शिक्षण देण्याचे वचन मात्र या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष भारत जाधव यांनी काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. एकूण २१ प्रश्न हाती घेत त्यांनी केलेल्या जाहीरनाम्यात नव्या योजनांचा कसलाच समावेश नाही. सध्या महापालिका आर्थिक संकटात आहे. मनपाशी संलग्नित परिवहन विभागही डबघाईला आला आहे. हा धागा पकडून महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे वचन पक्षाने जाहीरनाम्यात दिले आहे. सध्या शहरात पाणी प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे महापालिकेत आपली सत्ता आल्यास दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
खड्डेमय शहर आणि धूळमय शहर हा शहरावर बसलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने खड्डेमुक्त आणि धूळमुक्त शहर बनविण्याचा संकल्पही जाहीरनाम्यात सोडला आहे. त्याचबरोबर कचरामुक्त शहर, पार्किंग व्यवस्था, सक्षम आरोग्य सेवा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सर्वत्र ड्रेनेज व जलवाहिनी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, निरोगी सोलापूर, उद्योगांना पायाभूत सुविधा, हॉकर्स झोनची अंमलबजावणी, हेरिटेज जतन आदी विषय मार्गी लावण्याचे अभिवचन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
--------------------------
सुलभ शौचालये अन् हिरव्यागार बागा
आज सोलापूर शहराचा विस्तार वाढत चालला आहे. स्मार्ट सिटीच्या यादीत सोलापूरचा समावेश करण्यात आला आहे. असे असताना महिलांसाठी काही ठिकाणचा अपवाद वगळता कुठेच सुलभ शौचालये नाहीत. हा प्रश्न महिलांसाठी नेहमीच सतावणारा आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसने हा विषय हाती घेऊन सुलभ शौचालये उभारण्याचा मनोदय जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. शिवाय शहरातील बागबगिच्यांची झालेली दुरवस्थाही दूर करुन हिरव्यागार बागा करण्याचे वचन जाहीरनाम्यात दिले आहे.