राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त!

By Admin | Published: October 20, 2014 05:05 AM2014-10-20T05:05:14+5:302014-10-20T05:05:14+5:30

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.

Nationalist party destroyed! | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त!

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त!

googlenewsNext

विजय बाविस्कर
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील ४४ जागांपैकी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला प्रत्येकी केवळ १० जागा मिळाल्या. या तीनही जिल्ह्यांत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपा लाटेचा शिवसेनेलाही मोठा फटका बसला आहे.
सहकाराचे जाळे असलेल्या पश्चिम महाराष्ट्राने राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसला नेहमीच साथ दिली. मात्र, या वेळी भाजपाने नियोजनबद्ध प्रचार करून तीनही पक्षांना आस्मान दाखविले. राष्ट्रवादीच्या बंडखोरांनाच स्वत:कडे घेऊन ताकद वाढविण्याची भाजपाची रणनीती होती. मात्र, मोदीलाट इतकी प्रभावी होती की या रणनीतीची आवश्यकता भासली नाही. शहरी भागांत भाजपाने मोठी आघाडी घेतली. पुणे शहरातील आठही जागा भाजपाने जिंकल्या. लक्ष्मण जगताप, राहुल कुल हे राष्ट्रवादीचे तगडे बंडखोर भाजपामध्ये आल्याने त्यांची ताकद वाढली. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव कॉँग्रेसच्या जिव्हारी लागला. श्रीगोंद्यातून माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेले पक्षांतर मतदारांनी झिडकारले. जुन्नरमधील शरद सोनवणे यांचा अनपेक्षित एकमेव विजय हा मनसेची राज्यात लाज राखणारा ठरला. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती निसटत्या मतांनी विजयी झाल्या. पुणे, नगरमध्ये फटका बसताना सोलापूरने मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादीला तारले.

Web Title: Nationalist party destroyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.