राष्ट्रीयत्व हेच हिंदूत्व : संभाजी भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:59 PM2018-06-10T22:59:29+5:302018-06-10T22:59:29+5:30
नाशिक : हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदू संस्कृती आणि धर्म आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहे. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो लढा उभारला आणि गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या देवताचे कतृत्व समाज विसरत चालला आहे, अशी खंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी व्यक्त केली.
रायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्संस्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीच्या प्रचार-प्रसारासाठी नाशिकमध्ये रविवारी (दि. १०) भिडे यांची रविवार कारंजा परिसरातील एका सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिडे यांनी ‘हिंदू धर्म व संस्कृती महात्म्य आणि छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आपले मत मांडले.
राज्यकर्ते आणि समाज हा स्वार्थी प्रवृत्तीचा असून, त्यांनी शिवरायांविषयीचा मान-सन्मान, आदर-अभिमानाचा विसर पडला आहे. हा समाज त्यांच्यासोबत लबाडी करत असल्याची टीकाही यावेळी भिडे यांनी केली. आजची पिढी शिवरायांच्या भूमीत आणि हिंदुस्थानात उच्चशिक्षण घेऊन आणि बक्कळ पैसा मिळविण्याच्या आमिषापोटी इंग्रजांच्या भूमीत जाऊन चाकोरी करतात व मातृभूमीचे ऋ ण विसरतात अशांना भारतीय म्हणण्याची मुळीच गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सभेचा समारोप ‘शिवरायांचे आठवावे रूप...’ या ध्येयमंत्राच्या सामूहिक पठणाने झाला. संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास सुरू झालेले भिडे यांचे भाषण सव्वानऊ वाजता संपले. यावेळी सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी सायंकाळच्या सुमारास काही विरोधकांना पोलिसांनी शालिमार चौकातच रोखून धरत त्यांची समजूत काढल्याने सभा शांततेत पार पडली. सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
--इन्फो--