राष्ट्रीयीकृत बँकांत आता विभागवार संपाचा पायंडा

By admin | Published: October 17, 2014 08:58 PM2014-10-17T20:58:34+5:302014-10-17T22:52:04+5:30

१२ नोव्हेंबरला देशभरात संप : २ ते ५ डिसेंबरला चार ठिकाणी विभागवार संप; ३० नोव्हेंबरला निदर्शने

Nationalized banks now have a divisional strike schedule | राष्ट्रीयीकृत बँकांत आता विभागवार संपाचा पायंडा

राष्ट्रीयीकृत बँकांत आता विभागवार संपाचा पायंडा

Next

रमेश पाटील- कसबा बावडा -- विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेकवेळा संप केले, निदर्शने केली; परंतु व्यवस्थापनाने या संपाची फारशी गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांनी ‘इफेक्टिव्ह’ संप होण्यासाठी संपाची स्टाईल बललली आहे. एकाच दिवशी, एकाचवेळी देशभर संप करण्याऐवजी विभागवार संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २ ते ५ डिसेंबरला असा सलग चार दिवस विभागवार संप होणार आहे. संप जरी उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत आणि पश्चिम भारत असा वेगवेगळ्या ठिकाणी झाला तरी त्याचा देशभरातील ग्राहकाच्या व्यवहारावर मात्र फार मोठा परिणाम होऊ शकतो.
२५ टक्के पगारवाढ करावी या मागणीचे निवेदन ३० आॅक्टोबर २०१२ रोजी संघटनांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाला दिले होते. आता या मागणीला दोन वर्षे होऊन अद्याप समाधानकारक तोडगा व्यवस्थापनाने काढला नसल्याचा दावा संघटनांचा आहे. याचाच एक भाग म्हणून
१० आॅक्टोबरला कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर १३ तारखेपासून नियमानुसार काम सुरू केले. आता तर १२ नोव्हेंबरला संपूर्ण देशभरात एकाचवेळी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात देशभरातील नऊ संघटनांचे सुमारे १० लाखांहून अधिक कर्मचारी
सहभागी होणार आहेत. तसेच या संपानंतर ३० नोव्हेंबरला बँकांच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून व्यवस्थापकांच्या कारभाराविरुद्ध घोषणा देण्यात येणार आहेत.
१२ नोव्हेंबरला एक दिवसाचा संप झाल्यानंतर २ डिसेंबरपासून पुन्हा विभागवार संप सुरू होणार आहेत. २ डिसेंबरला संपूर्ण दक्षिण भारतात एक दिवसाचा संप होणार आहे. त्यावेळी देशभरातील इतर विभागांत मात्र बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. मात्र, एका विभागात संप असला आणि दुसऱ्या विभागातील बँका सुरू असल्या तरी त्याचा इफेक्ट हा काही प्रमाणात ग्राहकांच्या व्यवहारावर होणार आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या दक्षिण भारतातील ग्राहकाने उत्तर भारतातील बँकेत खाते असलेल्या कंपनीबरोबर आॅनलाईन व्यवहार करायचा म्हटले तरी हा व्यवहार त्यावेळी उत्तर भारतात संप असल्यामुळे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजेच दक्षिण भारतातील बँकांचा संप नसतानासुद्धा उत्तर भारतातील बँकांचा संप असल्याने व्यवहार न झाल्याने त्याचा फटका ग्राहकाला बसणार आहे.
अशा पद्धतीने बँका सलग चार दिवस बंद रहाणार आहेत. त्यानुसार ३ डिसेंबरला उत्तर भारतात, ४ डिसेंबरला पूर्व भारतात, तर ५ डिसेंबरला पश्चिम भारतात संप करण्यात येणार आहे. २५ टक्के पगारवाढ करावी, नोकरभरती करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, कार्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.

‘विड्रॉल आॅफ एक्स्ट्रा को-आॅपरेशन’
व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी, दि. १३ आॅक्टोबरपासून सर्वच बँकांत ‘विड्रॉल आॅफ एक्स्ट्रा को-आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. विड्रॉल आॅफ एक्स्ट्रा को-आॅपरेशन म्हणजे नियमानुसार काम करणे. जादा काम न करणे, जास्त वेळ बँकांत न थांबणे, पेंडिंग काम पूर्ण करण्यासाठी सुटीदिवशी बँकांत काम करण्यासाठी न येणे.

Web Title: Nationalized banks now have a divisional strike schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.