अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशव्यापी आंदोलन करणार - मुक्ता दाभोलकर
By admin | Published: July 20, 2016 05:19 PM2016-07-20T17:19:34+5:302016-07-21T11:27:22+5:30
हिंसेला नकार, मानवतेचा स्विकार हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. २० जुलै रोजी या आंदोलनाला दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - हिंसेला नकार, मानवतेचा स्विकार हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. २० जुलै रोजी या आंदोलनाला दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात झाली असून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन २० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आज ३५ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या हत्येचा निषेध करण्यासाठी व दाभोलकर यांना महर्षी शिंदे पूलावर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ता दाभोलकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ३५ महिने होऊनही तपासयंत्रणा अतिशय संथगतीने काम करत आहेत. हत्या आणि खून असे प्रकार केवळ पाकिस्तान आणि बांग्लादेशात घडतात असे आतापर्यंत वाटत होते. मात्र आपल्या देशातही या गोष्टी सर्रास होत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. स्त्रीला सन्मानाने वागण्याचीही मुभा आपल्या देशात राहीली नाही हे कोपर्डीच्या प्रकरणावरुन आपल्याला दिसून येते. आपले कोणीही काहीही बिघडवू शकत नाही असा समज गुन्हेगारांमध्ये निर्माण होत आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठी लोकशाहीमध्ये हिंसेचा मार्ग वापरणे हे अतिशय गैर आहे. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले, या सर्व प्रकरणामध्ये पोलिस आणि सीबीआयनी योग्य पद्धतीने तपास करणे गरजेचे आहे. कोपर्डीमधील बलात्कार प्रकरणाचाही त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. बलात्काऱ्याना जात-पात, धर्म काहीही नसते. त्यांची विकृत मानसिकता हेच या गुन्ह्याचे मूळ कारण आहे, ही मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे केवळ कायदा व सुव्यवस्था करुन उपयोग नाही.
पावसाळी अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाने डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीही विषय काढला नाही ही खेदाची बाब आहे. जागतिक पातळीवर हिंसेने थमौन घातले असताना अशा हत्यांचा प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारावा लागेल असे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. या हत्येचा निषेध म्हणून पुढील एक महिना आपण केवळ एकच वेळ जेवण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मिलिंद देशमुख म्हणाले, डॉक्टरांचे मारेकरी शोधण्याचा यंत्रणेकडून केवळ देखावा होत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत संघटनेचा लढा चालूच राहील.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चित्रपट महोत्सव व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. अशाप्रकारच्या महोत्सवामुळे आजचा तरुण अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत नेमका काय विचार करतो हे यानिमित्ताने समोर येईल. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.
सैैराट आता माझा राहीला नाही...
भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा चौैधरी यांनी सैराटमुळे तरुण बिघडत असल्याने या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी नुकतीच केली होती. त्यापार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांना विचारले असता ते म्हणाले, सैराट आता माझा राहीला नाही, तो आता जनतेचा झाला आहे. कोणत्याही कलेवर अशाप्रकारे बंदी घालून काहीही साध्य होणार नाही. मला जे वाटत होतं ते मी कलेच्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहे.
नागराज मंजुळे, दिग्दर्शक