नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित

By Admin | Published: July 2, 2017 04:44 AM2017-07-02T04:44:57+5:302017-07-02T04:45:05+5:30

सध्याची नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. शहरांचा विकास

Natural disasters are man-made | नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित

नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सध्याची नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. शहरांचा विकास करताना पर्यावरणाचा विनाश होत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संकल्प सरकारने केला असून, वन विभागामार्फत तीन  वर्षांत ५० कोटी झाडे लावली  जाणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.
शासनाच्या वन विभागामार्फत राज्यात वृक्ष लागवड महामोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याकरिता १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण सप्ताह साजरा होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐरोली येथे करण्यात आला. या वेळी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असून, शहरांचा  विकास करताना जल, जंगल व  जमीन यांचा विनाश होत असल्याने नैसर्गिक आपत्ती ओढावत असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
तर ईशा फाउंडेशनतर्फे देशभर ‘नदी बचाव’ मोहीम राबवली जात आहे. ईशा फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक करत, महाराष्ट्रातही सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत ‘नदी बचाव’ मोहिमेत सरकार सोबत असेल, अशी ग्वाही दिली.

तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावणार

तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा उपक्रम वन विभागामार्फत  हाती घेण्यात आला असून, यंदा ४ कोटी झाडे लावली जाणार आहेत. या सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी ऐरोली येथील जैव विविधता केंद्रालगतच्या मोकळ्या जागेत १८०० झाडांची लागवड करण्यात आली.

या वेळी कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सद्गुरू जग्गी वासुदेव, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा
म्हात्रे आदी उपस्थित होते.


महावितरण ७० हजार वृक्षांची लागवड करणार

महावितरणच्या वतीने राज्यभरातील विविध कार्यालयांत सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.

१ जुलै ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. या संकल्पांतर्गत राज्यभरातील सोळा परिमंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांत, ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण करण्यात आलेल्या
झाडांचे संगोपन महावितरणचे कर्मचारी करणार आहेत.


मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा; यासाठी वृक्षारोपण

वातावरणात मिथेन व कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढत असून, मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई महापालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

वन विभागातर्फे राज्यात १ ते ७ जुलैदरम्यान ४ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यानिमित्त महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवासात शनिवारी करण्यात आला.

या वेळी महाडेश्वर बोलत होते. महापौर म्हणाले की, मुंबईत अनेक ठिकाणी विविध संस्थांमार्फत वृक्षारोपण करण्यात येत असून, मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आॅक्सिजन देणाऱ्या या वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे.

शनिवारी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात शाळा, उद्याने, राज्य व केंद्राच्या संस्थांच्या आवारात विविध झाडांचे रोपण झाले. मुंबईत सुमारे ३५ हजार वृक्षांची लागवड २४ विभाग कार्यालयांत उद्यान विभागाकडून करण्यात येणार आहे.

Web Title: Natural disasters are man-made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.