आरोग्यदायी होळीसाठी नैसर्गिक पर्याय
By admin | Published: March 22, 2016 01:25 AM2016-03-22T01:25:42+5:302016-03-22T01:25:42+5:30
होळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व रंग विक्रीसाठी आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांतून वेगवेगळे रंग व नावीन्यपूर्ण पिचकाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत
पिंपरी : होळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व रंग विक्रीसाठी आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांतून वेगवेगळे रंग व नावीन्यपूर्ण पिचकाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. यंदाच्या होळीसाठी बाजारात नवीन पर्यावरणपूरक रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आरोग्यदायी होळी आणि धूलवड साजरी करण्यासाठी विविध प्रकारांत नैसर्गिक रंग बाजारात दाखल झाले आहेत.
पारंपरिक रंगांबरोबरच हर्बल कलर, हर्बल गुलाल खरेदी करता येतील. लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा अशा विविध रंगांबरोबर हर्बल रंगांमध्ये चंदेरी व सोनेरी रंगही उपलब्ध आहेत. या धूलवडसाठी वेलवेट प्रकारचे रंग लोकप्रिय आहेत. विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले हे रंग मऊ, मखमली असून, त्यांचा पोत हे खास आकर्षण आहे. नैसर्गिकरीत्या तयार केलेले व पर्यावरणपूरक रंग साधारण किमतीत उपलब्ध आहेत.
हर्बल कलरव्यतिरिक्त यंदा फळांच्या फ्लेवरमध्ये रंग उपलब्ध असून, त्यांत फ्रेश लेमन, ग्रीन अॅपल, स्ट्रॉबेरी, आॅरेंज इत्यादी प्रकारांचा पर्याय आहे. दोनशे रुपयांपासून पुढे हे रंग विकत घेता येतील. रंगांचा पोत आणि फ्लेवरच्या आकर्षणाबरोबरच ही धूलवड सुगंधित करता येईल, यासाठी बाजारात सुगंधित रंगही उपलब्ध आहेत.
बाजारात असलेले रंग स्प्रे, ट्यूब, पावडर स्वरूपात उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या रंगांच्या किमती वाढलेल्या असल्या, तरी रंगांमध्ये असलेले नावीन्य यामुळे रंग खरेदी जोरात असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. यंदा रंग व पिचकाऱ्यांसोबत रंग धुऊन काढण्यासाठी शाम्पू, तेलदेखील विक्रीसाठी दाखल झाले आहे.
मुलांसाठी पिचकाऱ्यांची धूम
बाजारात पिचकाऱ्यांमध्ये नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. प्लॅस्टिक व स्टिलच्या पिचकाऱ्यांसोबत थर्माकोलच्या पिचकाऱ्या ट्रेंडमध्ये आहेत. बच्चे कंपनीची खासियत असलेल्या या ‘वॉटर गन्स’ची पाण्याची क्षमता वाढली आहे. एकीकडे पाणीकपात, दुष्काळ असताना तीन ते चार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या पिचकाऱ्या खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. ४०० पासून ते १४०० रुपयांपर्यंत या पिचकाऱ्या खरेदी करता येतील.
जास्त लिटर पाणी क्षमतेबरोबरच यंदा वेगवेगळ्या प्रकारांतील पिचकाऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. सध्या अम्ब्रेला गन बाजारात दाखल झाल्या असून, यात पिचकारीची रचना छत्रीप्रमाणे करण्यात आली आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर रंग उडवताना आपण भिजणार नाही, अशी रचना आहे. यात छोटा भीम, डोरेमॉन, मिनी-मिकी, टॉम कॅट, अँग्री बर्ड्स, निन्जा, बेन टेन अशा कार्टून्सच्या आहेत. या छत्री पिचकाऱ्यांची किंमत १५० ते २०० रुपये आहे. पाठीवर दप्तर किंवा सॅकसारख्या टांगता येतील अशा पिचकाऱ्या ४५० रुपयांपासून पुढे खरेदी करता येतील. विविध कार्टून्सच्या सॅक असून, पाण्याची क्षमता ३ ते ४ लिटर आहे.
होळीसाठी दर वर्षीच बाजारात बदल होतात. या वर्षीही पिचकारी व रंगांमध्ये विविध प्रकार आहेत. काच रंग किंवा कृत्रिम रंगांपेक्षा नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंग खरेदी करण्याकडे कल आहे, असे व्यावसायिक रवी दोलवानीट यांनी सांगितले.
रंगातील रासायनिक घटक त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते.
घरगुती पद्धतीने तयार केलेले रंग त्वचेसाठी सुरक्षित असून, योग्य काळजी घेतल्यास होळीचा आनंद घेता येईल, असे वायसीएमचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रताप जयसिंघानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘पाणी वाचवा, दुष्काळ टाळा’
पिंपरी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरडी होळी साजरी करून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे नियोजन केले आहे. काही सजग संस्थांनीही पाण्याचा अपव्यय टाळून कोरडी होळी साजरी करण्याची शपथ घेतली आहे. काळेवाडी, रहाटणी, चिंचवड या भागात पाणी बचतीचा संदेश देण्यात आला आहे. ‘पाणी वाचवा, दुष्काळ टाळा’, ‘पाणी वाचवा देश वाचवा’ असा संदेश देण्यात येत आहे. शाळांमध्ये कोरडी होळी खेळण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आहे.