मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:17 AM2020-02-24T03:17:49+5:302020-02-24T03:18:05+5:30

न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

The nature of the Maratha agitator deteriorated | मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली

मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली

Next

मुंबई : भरती प्रक्रियेतील तरुणांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा उमेदवारांचे आझाद मैदानात २७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी आंदोलक अतिष पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करून दुपारी सोडण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार नितेश राणे यांनी आंदोलक मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा उमेदवारांचे २७ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी आंदोलक अतिष पाटील हे दोन वेळा चक्कर
येऊन पडले.

२७ दिवसांपासून मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याबाबत आम्ही विधिमंडळ सभागृहात आक्रमक भूमिका मांडू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

तरतुदींना स्थगिती दिलेली नाही
फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांना कायद्यातील तरतुदींनुसार नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने एकमताने संमत केला होता. न्यायालयानेही अद्याप हा कायदा अमान्य केलेला नाही. उपोषणाला बसलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाल्या पाहिजेत.
कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरकारने कार्यवाही करणे आवश्यक आहे. हा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही तरतुदींना कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

Web Title: The nature of the Maratha agitator deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.