निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 08:32 PM2020-05-25T20:32:00+5:302020-05-25T20:32:08+5:30
राज्यातील बर्याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आता निसर्गाने विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात लॉकडाऊन आणला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना घरात बसून राहण्याची वेळ आली आहे़.विदर्भाच्या बर्याच ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.
राज्यातील बर्याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात; तसेच देशात अकोला येथे सर्वाधिक कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २०.७ अंश सेल्सिअस होते. राज्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील बहुताश ठिकाणच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. मराठवाड्यातही ४ अंश सेल्सिअस, तर मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणच्या तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
इशारा : २६ व २७ मे रोजी विदर्भात बर्याच ठिकाणी उष्णतेची लाट, तर तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.२८ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
........
जळगाव, अहमदनगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात २६ व २७ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.नाशिक जिल्ह्यात २६ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
......
बंगालच्या उपसागरात महाचक्रीवादळ आल्याने मॉन्सूनची प्रगती गेले काही दिवस थांबली होती. मॉन्सूनचे आगमन अंदमान समुद्रात झाल्यानंतर तो अजूनही तो तेथेच रेंगाळला होता. आता मॉन्सूनच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झाले असून, २७ मेपर्यंत मॉन्सून बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमान समुद्र, व मध्य बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्याचीशक्यता आहे.
.....
राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस):
पुणे- ४०.१/२४.२, लोहगाव- ४१/ २४.३, जळगाव- ४५.३/२९.६, कोल्हापूर- ३७.४/२५, नाशिक- ३९.२/२३.५, सांगली- ३९.७/२४.८, सातारा- ४०.४/२४.७, सोलापूर - ४५/२७.७, मुंबई- ३४.२/२७.१, सांताकु्रझ- ३३.७/२८.४, अलिबाग - ३३.१/२७.९, रत्नागिरी- ३४.६/२७.७, पणजी- ३५.५/२९.४, औरंगाबाद- ४६/२७.१, नांदेड ४५.५/२८, अकोला- ४७.४/२९.६, अमरावती- ४६/२८.२, बुलढाणा- ४२.६/२९, ब्रह्मपुरी- ४५.२/२८.५,चंद्रपूर- ४६.८/२७.५, गोंदिया- ४५.८/२८.६, नागपूर- ४७/२६.७, वर्धा- ४६/२९.५़