नाट्यसंमेलन हे नाट्यकर्मींचं गेटटुगेदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 04:32 AM2018-06-10T04:32:14+5:302018-06-10T04:33:08+5:30
यंदा प्रथमच ६० तास सलग चालणाऱ्या या नाट्यसंमेलनाकडे स्वत: प्रसाद कांबळी कसे पाहतात? त्यांची या संमेलनाविषयीची भूमिका त्यांनी लोकमतच्या विशेष मुलाखतीत मांडली...
98 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिराच्या प्रांगणात रंगणार आहे. नाट्य परिषदेची निवडणूक जिंकत प्रसाद कांबळी यांनी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. कांबळी आणि त्यांच्या टीमने पदभार सांभाळल्यानंतरचे हे पहिलेच नाट्यसंमेलन. ताज्या दमाच्या या टीमकडून नाट्यकर्मी आणि रसिकांच्याही खूप अपेक्षा आहेत. नीरस होत चाललेल्या नाट्यसंमेलनामध्ये नवीन जान फुंकण्याची मोठी जबाबदारी ही टीमवर आहे. आम्ही नक्कीच काही तरी वेगळं करू असा आशावाद ही टीम व्यक्त करते आहे. यंदा प्रथमच ६० तास सलग चालणाऱ्या या नाट्यसंमेलनाकडे स्वत: प्रसाद कांबळी कसे
पाहतात? त्यांची या संमेलनाविषयीची भूमिका त्यांनी लोकमतच्या विशेष मुलाखतीत मांडली...
तुम्ही अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यावर तुमचं हे पहिलंच नाट्यसंमेलन आहे? तुम्ही कसं पाहताय या संमेलनाकडे?
नाट्य परिषदेची निवडणूक संपल्यावर निकाल आमच्या बाजूने लागला. परिषदेच्या सभासदांनी आमच्या ‘आपलं पॅनल’ला कौल दिला आणि माझी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. माझ्याबरोबरचा प्रत्येक सहकारी हा नाट्यकर्मी आहे. अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून परिषदेचा पहिला संकल्प होता तो नाट्यसंमेलन करणे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. डोक्यात एकच कल्पना होती की, आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी ही निवडणूक लढवली आहे. त्याप्रमाणे नाट्यसंमेलन ही वेगळ्या स्वरूपात करणं गरजेचं आहे. नाट्य परिषदेचा निवडणूक कार्यक्रम असल्याने नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं. त्याप्रमाणे आम्ही मेमध्ये या कामाला सुरुवात केली. मुंबईबाहेर संमेलन करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे कमी कालावधीत मुंबईतच संमेलन करायचं आम्ही ठरवलं. बोरीवली, नवी मुंबई अशा ठिकाणांची यादी आमच्या डोक्यात घोळत होती. मात्र बोरीवलीमध्ये नाट्य परिषदेची निवडणूक असल्याने तिकडे संमेलन घेण्यात अडचणी होत्या. मुलुंड नाट्य परिषद शाखेने शेवटच्या क्षणी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि मुलुंडमध्ये १३, १४, १५ जूनला हे नाट्यसंमेलन घेण्यावर आम्ही शिक्कामोर्तब केले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना आम्ही याविषयी माहिती दिली. त्यांनी लगेच या संमेलनाला होकार देत स्वागताध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यामुळे आमचा हुरूप अजून वाढला.
नाट्यसंमेलनातील परिसंवाद हे अतिशय नीरस असतात, असं गेल्या काही वर्षांतील चित्र आहे. या वेळी काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का?
परिसंवाद खरंच खूप निरस असतात ही गोष्ट अगदी खरी आहे. जेवढे मान्यवर व्यासपीठावर असतात तितकी संख्या खाली प्रेक्षागृहातही नसते हे चित्र गेल्या काही नाट्यसंमेलनांमध्ये नक्कीच दिसलंय. आम्ही यावर काही ज्येष्ठ रंगकर्मी आणि काही पत्रकारांकडूनही माहिती घेतली. या नाट्यसंमेलनात आम्ही फक्त एकच परिसंवाद आयोजित केला आहे. सांस्कृतिक आबादुबी असं या परिसंवादाचं नाव आहे, जो १४ जूनला होणार आहे. या परिसंवादात रंगभूमीवरच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत. ज्यात ज्येष्ठ रंगकर्मींसोबतच आजच्या काळातील तरुण दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ भाग घेणार आहेत. यात रंगभूमीवरचे आजचे प्रश्न यावर साधकबाधक चर्चा होणार आहे. या परिसंवादाचं सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी आणि ऋषीकेश जोशी करणार आहेत. रंगभूमीवरील प्रश्नांना सर्व अंगांनी कसं सोडवता येईल यावर चर्चा होईल.
संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नेत्याचं वर्चस्व असतं. यावरून संमेलन राजकारण्यांचं आहे की रंगकर्मींचं अशी टीकाही होते. त्याबद्दल काय वाटतं?
मला असं वाटतं की आपण आपल्या मानसिकतेमध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे. नाट्यसंमेलन हे १०० टक्के रंगकर्मींचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. की कोणत्याही कलेला राजाश्रय असावाच लागतो. हे काही आज घडत नाहीये हे कित्येक वर्षांपासून घडत आलंय. तरीही दरवर्षीसारखा भपका, स्टेजवर ५० माणसं या गोष्टी आम्ही या वेळी टाळल्या आहेत. आम्ही काही सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय. संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. ९७ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर हे ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडे संमेलनाची सूत्रं सोपवतील. उद्घाटन सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वागताध्यक्ष विनोद तावडे हे तीनच राजकारणी असणार आहेत. बाकी आम्ही चौघंही रंगकर्मी आहोत. केवळ सात जण उद्घाटन सोहळ्याला स्टेजवर असतील. बाकी सगळे मान्यवर व्यक्ती, पदाधिकारी हे रंगमंचासमोर प्रेक्षागृहात बसणार आहेत. समारोपालाही फक्त ५ जण स्टेजवर असतील. उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, विनोद तावडे, मी आणि कीर्ती शिलेदार. त्यामुळे या वर्षी तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तुमचं हे पहिलंच संमेलन आहे. तुमच्यावर टीकाही होते, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
जे मेहनत करतात त्यांच्याकडून चुका होतात असं मी मानतो. आमची पूर्ण टीम झोकून देऊन काम करतेय. भरत जाधव, डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, मधुरा वेलणकर, सुकन्या कुलकर्णी-मोने, सतीश लोटके, नाथा चितळे, सुनील देवळेकर, रत्नाकांत जगताप, संतोेष काणेकर, दिगंबर प्रभू, अशोक नारकर, संदीप जंगम, आमचे सर्व रंगमंच कामगार, व्यवस्थापक संघ, नाट्य परिषदेचे सर्व कर्मचारी एका ध्येयाने नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मुलुंड नाट्य परिषद शाखेचा इथे मी मुद्दाम उल्लेख करीन की त्यांनी फार कमी दिवसांत या नाट्यसंमेलनाची चोख तयारी केली आहे. मुलुंड नाट्य परिषदेच्या सर्व मेंबर्सनी दिवसरात्र कष्ट घेतलेत. इतक्या मोठ्या कार्यक्रमात छोट्या-मोठ्या चुका या होतच असतात. आणि चुका या झाल्याच पाहिजेत कारण त्यातूनच माणूस शिकतो. मला वाटतं मी एकटाच नाही तर आम्ही सगळेच रंगकर्मी काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला मायबाप रसिक प्रेक्षक नक्कीच दाद देतील याची मला १००० टक्के खात्री आहे. तरुण रंगकर्मींना आम्ही नक्कीच नाट्यसंमेलनापर्यंच घेऊन येऊ हा विश्वास माझ्यामध्ये आहे. १६ जूनला पहाटे सुखन या कार्यक्रमाद्वारे नाट्यसंमेलनाचं सूप वाजेल. पण ही एका नव्या नांदीची सुरुवात असेल असं आमच्यातील प्रत्येकाला वाटतं. हे अधिवेशन नाहीये तर हे प्रत्येक नाट्यकर्मींचं गेटटुगेदर आहे या मताचे आम्ही सर्व जण आहोत. तेव्हा चुका होतील पण नक्कीच त्यातून चांगलंही घडेल...
या वेळी संमेलनात मध्यरात्रीही कार्यक्रम आहेत. त्यांना रसिकांचा प्रतिसाद मिळेल का ?
मुंबईकर रसिक हा जागरूक प्रेक्षक आहे. आता मला सांगा दशावतार, लोककला जागर, संगीत बारी हे कार्यक्रम सकाळी कोणी केले तर प्रेक्षक येईल का ? प्रत्येकाची एक परंंपरा आहे. कोकणात दशावतार हा रात्रीच रंगतो आणि संगीत बारी हा कार्यक्रमही असाच रात्री रंगत जातो. प्रेक्षक सुज्ञ आहेत. त्यांना नवीन आणि काही चांगलं पाहायला मिळालं तर ते वेळ बघत नाहीत.
ते अशा कार्यक्रमांना नक्की प्रतिसाद देतात.
नाट्यसंमेलनाची तयारी कुठपर्यंत आली आहे ?
६० तास सलग हे नाट्यसंमेलन करायचं आम्ही ठरवलंय आणि त्याप्रमाणे अगदी योग्य पद्धतीने आम्ही त्याची तयारी करतोय. या नाट्यसंमेलनाची काही वैशिष्ट्यं असणार आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांतील लोककलांवर आधारित नाट्यदिंडीचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याचबरोबर या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार आहेत. त्यामुळे संगीत सौभद्र, राहुल देशपांडे, आनंद भाटे, मंजुषा पाटील, सावनी शेंडे यांचं गायन, खुद्द कीर्ती शिलेदार यांची प्रकट मुलाखत आणि त्यांचा लाइव्ह परफॉर्मन्स अशी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे.
या संमेलनात नवीन काय पाहायला मिळणार आहे?
आम्ही एक थीम ठरवली आहे. पंचरंगी पठ्ठेबापूराव, यमुनाताई वाईकर यांना समर्पित रंगबाजी, संगीतबारी, १९ दृष्टिहीन कलावंतांचं अपूर्व मेघदूत ही संगीत नाटिका, विदर्भातील दंडारच्या झाडेपट्टी रंगभूमीचा लोककला जागर, पोतराज, नमन, दशावतार, प्रायोगिक रंगभूमीवर गाजणारं शिकस्त-ए-इश्क, इतिहास गवाह है, चित्रविचित्र या एकांकिका, तेलेजू आणि जंबा बंबा बू ही बालनाट्यं असा सर्वसमावेशक कार्यक्रम आम्ही आखला आहे जो रसिकांना नक्कीच आवडेल.
नाट्यसंमेलात या वर्षी समारोपाआधी होणारे ठरावही होणार नाहीयेत... तुमची यामागे काय भूमिका आहे?
आमच्या नियामक मंडळाच्या बैठकीत सर्व सभासदांनी यावर विचार केला. दरवर्षी नाट्यसंमेलनात अनेक ठराव केले जातात. पण ते ठराव तेवढ्यावरच सीमित राहतात. नाट्य परिषदेवर सभासदांना, अध्यक्षांना ५ वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे पाचही वर्षं रंगकर्मींच्या प्रश्नांना सोडवणं हे आमचं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे नुसत्या ठरावापेक्षा कृती करण्यावर आमचा सगळ्यांचाच भर आहे. त्यामुळे ९८ व्या नाट्यसंमेलनामध्ये कोणत्याही प्रकारचे ठराव केले जाणार नाहीत असा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे.
कलाकार नाट्यसंमेलनाकडे पाठ फिरवतात.
तेच ते चेहरे दरवर्षी नाट्यसंमेलनात दिसतात. या वर्षी चित्र बदलेल का?
आधीच्या नाट्यसंमेलनात काय झालं यात मला मुळीच पडायचं नाही. आम्ही आमची नवीन सुरुवात केलीय. नाट्य परिषदेकडून प्रत्येक रंगकर्मीला ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करण्यात आलंय. मला इथे खास नमूद करावंसं वाटतं की नाट्य व्यवस्थापक संघ, नाट्य निर्माता संघ आणि रंगमंच कामगार यांनी मिळून एक महत्त्वाचा निर्णय या वर्षी घेतला आहे की, नाट्यसंमेलनाच्या या तीन दिवसांत कोणत्याही नाट्यगृहात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग लावायचे नाहीत. ज्यामुळे या नाटकात काम करणारे कलाकार, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ यांना नाट्यसंमेलनात सहभागी होता येईल. अनेक कलाकारांनी मला व्यक्तिश फोन करून आणि माझ्या नाट्य परिषदेतील सहकाऱ्यांना फोन करून माझी या नाट्यसंमेलनासाठी काही मदत हवी असल्यास हक्काने सांगा, अशी विचारणाही केली आहे. ही नव्या बदलांची नांदी आहे आणि मला वाटतं की, हे नाट्यसंमेलन त्याची एक सुरुवात आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
शब्दांकन : अजय परचुरे