मराठीला मिळतेय नवसंजीवनी!

By Admin | Published: January 3, 2017 06:29 AM2017-01-03T06:29:56+5:302017-01-03T06:29:56+5:30

भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला.

Navasanjivan gets Marathi! | मराठीला मिळतेय नवसंजीवनी!

मराठीला मिळतेय नवसंजीवनी!

googlenewsNext

पुणे : भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. भाषेची समृद्धी जपली जावी, ही परंपरा पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित व्हावी आणि मराठी अधिकाधिक समृद्ध व्हावी, यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच, शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये भाषेला नवसंजीवनी दिली जात आहे.
राज्य मराठी विकास संस्था, विद्यापीठाचा मराठी विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरवड्यानिमित्त दि. ४ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
मराठी भाषेतील खुल्या माहितीस्रोतांच्या विकासाला चालना मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. ज्येष्ठ संशोधक माधव गाडगीळ कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यापीठाप्रमाणेच महाविद्यालयांमधूनही भाषा संवर्धन कार्यशाळा, संहिता, नाटकलेखन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा अशा विविध माध्यमांतून भाषेचे संस्कार केले जात आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ‘साहित्य सहकार’ ही संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या साहित्य मंडळातर्फे एकांकिका, नाट्यस्पर्धा, कथालेखन अशा माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मराठी विभागातील प्रा. नागनाथ बळते यांनी दिली. मराठी भाषा विभागप्रमुख सिद्धार्थ आगळे आणि साहित्याची अभिरुची असणारे दोन विद्यार्थी अशी टीम या मंडळाचे नेतृत्व करते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमांध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे, कवितावाचनाचे कार्यक्रमही भाषेचे सौंदर्य खुलवतील. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये नुकताच ‘मायबोली’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत मराठीत सही करणे, चारोळी, काव्य, चिठ्ठीकाव्य, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व, कथावाचन, वादविवाद अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मध्ययुगीन काळातील साहित्यप्रकारांवर या वेळी भर देण्यात आला. त्याअंतर्गत भारुडातून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या काळात ग्रंथदिंडी काढून भजनाच्या माध्यमातून भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमांचा अहवाल तसेच दस्तावेज तयार करून ते जतन केले जाते. तसेच अरविंद जगताप यांनी ‘विद्यार्थ्यांनी लेखनाचे भान
कसे ठेवावे’ याबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Navasanjivan gets Marathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.