‘सोवळे मोडल्या’च्या प्रकरणाचे तीव्र पडसाद, संघटनांची आंदोलने, अंनिसने घेतली निर्मला यादव यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:05 PM2017-09-08T23:05:06+5:302017-09-08T23:07:25+5:30
स्वयंपाकीण बाईंनी खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून त्यांच्याविरुद्ध हवामान शास्त्र विभागाच्या तत्कालीन संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरामध्ये पुरोगामी चळवळीतील विविध संघटनांनी आंदोलन करीत या प्रकाराचा निषेध नोंदवला.
पुणे, दि. ८ - स्वयंपाकीण बाईंनी खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून त्यांच्याविरुद्ध हवामान शास्त्र विभागाच्या तत्कालीन संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आॅनलाईन 'लोकमत'ने सर्वप्रथम ही बातमी ब्रेक केली. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरामध्ये पुरोगामी चळवळीतील विविध संघटनांनी आंदोलन करीत या प्रकाराचा निषेध नोंदवला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेची भेट घेतली. दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने खोले यांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे.
संभाजी ब्रिगेडच्यावतीने सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांची भेट घेऊन खोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. देशाच्या सर्वोच्च स्थानी राज्य घटना असून संविधान सर्वोपरी आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही धर्म व्यवस्था, जात्यांध पद्धतीने धर्माच्या नावावर असलेल्या उतरंडी अस्तित्वात आहेत. खोले या सुशिक्षित आणि उच्चपदस्थ अधिकारी असतानाही त्यांनी निर्मला यादव यांच्या जातीवरुन केलेली तक्रार संतापजनक असल्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे. खोले यांच्याकडे जोशी नावाच्या गुरुजींनी यादव यांना कामासाठी पाठविले होते.
गौरी गणपती झाल्यानंतर त्यांची जात समजल्यामुळे भडकलेल्या खोलेंनी देव बाटला, सोवळे मोडले म्हणून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झाला असून खोले यांनी संविधानाचा अपमान केला आहे. खोले यांनी भावना दुखावल्याने प्रचंड चीड, संताप व राग पसरलेला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, सिद्धार्थ कोंढाळकर, सुभाष जाधव, प्राची दुधाणे उपस्थित होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वेधशाळेसमोर आंदोलने केले. मेधा खोलेंवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतानाच जातीयवादी वृत्तीचा धिक्कार आणि निषेध करण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदीनी जाधव यांनी यादव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. याप्रकाराचा अंनिसच्यावतीने तीब्र निषेध करण्यात आला आहे.
‘सोवळे मोडल्या’चे प्रकरण तापायला सुरुवात झाल्यानंतर विविध हिंदुत्ववादी आणि सामाजिक संघटनांनी निर्मला यादव यांची भेट घेतली. या सर्व संघटनांनी डॉ. मेधा खोले यांनी केलेले कृत्य निंदनीय असून त्याचा निषेध व्यक्त केला. हिंदू समाजाला लागलेला जातिवादाचा शाप नष्ट झालाच पाहिजे, जातीवादाला खतपाणी घालणा-या सर्व व्यक्ती व संघटनांचा जाहीर निषेध संघटनांच्यावतीने करण्यात आला. समाजातील अशा काही विकृतीमुळे हिंदू समाजाचे, नुकसान होऊन हिंदू समाज प्रागतिक होण्यास खीळ बसत आहे. खोले यांनी यादव यांची माफी मागावी व तक्रार मागे घ्यावी असे आवाहन या संघटनांनी केले आहे. समस्त हिंदू आघाडी, राजे शिवराय प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, लोकशाही जागर मंच, शिवसमर्थ प्रतिष्ठान, शिववंदना ग्रुप, अभिनव निर्माण प्रतिष्ठान, हिंदू महासभा या संघटनांनी यादव यांची भेट घेतली. खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेऊन सामोपचाराने प्रकरण मिटवावे. सोवळ्याचा थेट जातीशी कोणताही संबंध जोडता येणार नाही. शुचिर्भूतता आणि स्वच्छतेशी त्याचा संबंध आहे. यादव यांच्या वयाचा विचार करता त्यांनी गुन्हा मागे घ्यावा. हे प्रकरण वाढविणे समाजाच्यादृष्टीने हिताचे नाही. सामोपचाराने प्रकरण मिटवणेच योग्य असल्याची भुमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतल्याचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.
मी खोले यांच्या घरी गौरी गणपती, श्राध्दाच्या कार्यक्रमांना 2016 ते 2017 या काळात चार वेळा स्वयंपाक केला आहे. मला कोणत्याही कामाचे पैसे आजवर देण्यात आलेले नाहीत. बुधवारी रिक्षाचालक माझ्या घरी आला. त्याने मला तुम्हाला विदुला जोशी भेटायला आल्या आहेत असे सांगितले. घरी आलेल्या खोले यांनी जोरजोरात दार वाजवून गोंधळ घातला. घरात शिरुन तू मराठा आहेस, खंडोबा, म्हसोबा असे तुझे रस्त्यावरचे देव आहेत. तू माझे घरातले देव बाटवले आहेस असं म्हणत माझ्या डोक्यात पर्स मारली. खोले यांना मी फक्त निर्मला असे नाव सांगितले होते. कुलकर्णी असे नाव सांगितलेच नव्हते. मी ब्राह्मण असल्याची खोटी माहिती जोशी यांनी त्यांना दिली होती. - निर्मला यादव