ना दिबा पाटील, ना बाळासाहेब ठाकरे; राज ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी घेतली वेगळीच भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 01:12 PM2021-06-21T13:12:29+5:302021-06-21T13:22:19+5:30
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला; मनसेप्रमुखांनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणामुळे वातावरण तापलं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विमानतळ नामकरणावरून नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी आज मुंबईत 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणंच संयुक्तिक राहील असं राज यांनी सांगितलं.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारलं आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. 'मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,' असं राज ठाकरे म्हणाले.
'बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,' अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,' असं राज म्हणाले.
विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसैनिकांची आहे. त्यांचा दि. बा. पाटील नावाला विरोध आहे, त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं, ही माझी भूमिका आहे. आता बघू कोण विरोध करतं, अशा शब्दांत राज ठाकरे गरजले.