नवी मुंबई सर्वच महामार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:16 AM2018-01-04T05:16:45+5:302018-01-04T05:17:08+5:30
बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते.
नवी मुंबई - बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते.
बंदमध्ये दुकानदार, व्यापारी, यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. दिघा येथील भीमसैनिकांनी सकाळी ९ वाजताच ठाणे-बेलापूर मार्ग अडवला. मोठ्या प्रमाणात महिला-पुरुषांसह तरुणांचा जमाव रस्त्यावर उतरला. त्यानंतर तुर्भे, सीबीडी, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, कळंबोली या ठिकाणी रास्ता रोको झाल्याने मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते. अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तर दोन ठिकाणी एनएमएमटीच्या बस फोडल्याचे प्रकार घडल्याने दुपारी २नंतर एनएमएमटीच्या बस बंद करण्यात आल्या होता. रबाळे, तुर्भे या ठिकाणी रेल रोको करून आंदोलन केले. तुर्भे येथे काहींनी रेल्वेवर दगडफेक केली. तर रबाळे येथे सुमारे ४० मिनिटे दोन्ही मार्गांच्या रेल्वे अडवण्यात आल्या. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी रेल्वेमार्ग मोकळा केला. अनेक ठिकाणी रिक्षाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. जमाव आक्रमक असल्याने आंदोलनाला गालबोट लागू नये, याकरिता शहरात सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
बाजार समितीमध्ये सौम्य लाठीमार
आंदोलकांनी मसाला मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. मार्केटमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलीस, माथाडी नेते व आरपीआयच्या नेत्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केल्यानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आली.
पण या बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारावरही परिणाम झाला. धान्य, भाजीपाला, फळ, मसाला व कांदा-बटाटा मार्केटमध्ये एकूण १३६४ वाहनांची आवक झाली. यापैकी फक्त ४३७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये विक्रीसाठी गेला. मध्यरात्री भाजीपाल्याच्या ५७७ वाहनांची आवक झाली. त्यापैकी ३१६ वाहनांमधून माल मुंबई, नवी मुंबईमध्ये विक्रीला गेला.